विशेष प्रतिनिधी-
Pimpri Chinchwad Politics : लोकसभेतील महाविकास आघाडीच्या यशानंतर आणि महायुतीत तिकीटांसाठी असलेली स्पर्धा ओळखून काही इच्छुकांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटापट उमेदवारीची संधी असलेल्या पक्षांत उड्या घेतल्या. त्यात भाजप आणि शिवसेनेपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेतेमंडळी आघाडीवर होते.
त्यात पुणे आणि विशेष म्हणजे अजित पवारांच्या (Ajit Pawar) होल्ड असलेल्या पिंपरी चिंचवडही समावेश होता. अनेक नेत्यांनी अभी नहीं तो कभी नही म्हणत दादांची साथ सोडली होती. यात विलास लांडे आणि अजित गव्हाणे या दोन दिग्गज नेतेही होते. पण विधानसभा निवडणुकीत महायुतीनं आघाडीचा धुव्वा उडवल्यानंतर पुन्हा याच नेत्यांसाठी अजित पवार पायघड्या घालताना दिसून येत आहे.
आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका त्यातही पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहराच्या राजकारणातील ‘चाणक्य’ माजी आमदार विलास लांडे आणि त्यांचे शिष्य अजित गव्हाणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची हालचाली सुरू केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला,असा दावा केला जातो. या निवडणुकीत महाविकास आघाडी पर्यायाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे लांडे-गव्हाणे यांनी समर्थकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि शरद पवारांशी (Sharad Pawar) हातमिळवणी केली होती.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी होण्याची पिंपरीतील विलास लांडे आणि अजित गव्हाणे या गुरु-शिष्याच्या जोडीची ही रणनीती आहे. मात्र, यामुळे स्थानिक पातळीवर भाजपा आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडणार,असे चित्र निर्माण झाले आहे.
राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अजित पवारांचे गुणगाण गाणे आणि त्याद्वारे महापालिका निवडणुकीत स्थान बळकट करण्याची ही त्यामागची रणनीती आहे. त्यामुळे महायुतीविरोधात काम करणाऱ्यांना अजित पवार यांनी खतपाणी घातल्यास शहरात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी स्थानिक वादाची ठिणगी पडणार आहे, असेही राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.
महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले. भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात संधी नाही. त्यामुळे विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांनी ‘‘पवार कुटुंबियांशी निष्ठा’’ हे सूत्र पुढे केले आणि अजित पवारांशी जवळीक साधण्यासाठी तयारी केली आहे.
वास्तविक,आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा आणि आमदार महेश लांडगे यांच्यासमोर आपला निभाव लागणार नाही.महाविकास आघाडी कधीही फूट शकते.त्यामुळे समर्थक नगरसेवकांना महाविकास आघाडीत संधी देता येणार नाही. याचा अंदाज आल्यामुळेच माजी आमदार विलास लांडे यांनी अजित पवार आणि पवार कुटुंबियांबाबत साखरपेरणी सुरू केली आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ‘तुतारी’ चिन्हावर भोसरीची निवडणूक लांडे आणि गव्हाणे यांनी प्रतिष्ठेची आणि अतितटीची केली.मात्र,भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आणि वर्चस्व कायम ठेवले.त्यामुळे लांडे-गव्हाणे यांच्यासह त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत दाखल झालेल्या २० ते २५ समर्थक माजी नगरसेवकांची मोठी राजकीय कोंडी झाली.
महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा लांडे-गव्हाणे यांच्या प्रवेशाला विरोध होता. किंबहुना,त्यांच्या प्रवेशामुळे अनेक निष्ठावंताची अस्वस्थता वाढली होती. सत्तेसाठी आणि तिकीटासाठीच लांडे-गव्हाणे यांनी प्रवेश केला, असा सूर होता.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहीत पवार असे दोन गट राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत. त्यातच खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचीही मनधरणी करावी लागते.त्यामुळे लांडे-गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घुसमट सुरू असल्याची चर्चा आहे.
महायुतीमधील घटकपक्ष आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार,असे संकेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षात स्थान मिळवण्यासाठी माजी आमदार विलास लांडे आणि अजित गव्हाणे इच्छुक आहेत. त्यासाठी अजित पवार यांच्यासोबत संवाद झाला असून, ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.
मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमदेवार महेश लांडगे यांच्या विरोधात उमेदवारी घेणे आणि महायुतीविरोधात प्रचार करण्याची भूमिका लांडे-गाव्हाणे या नेत्यांनी घेतली.आता अजित पवारांच्या बोटाला धरुन महायुतीमध्ये सत्तेतील वाटा मिळवण्यासाठी दादांचं गुणगाण करण्याची भूमिका म्हणजे ‘‘आवळा द्या अन् कोहळा काढा’’ असा प्रकार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.