Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरुवातीला खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या बाजूने असल्याचे चित्र पाहायला मिळाले, पण लगेचच त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. यानंतर दरम्यानच्या काळामध्ये अमोल कोल्हे हे कधी अजित पवारांसोबत तर कधी शरद पवारांच्या सोबत दिसले. त्यामुळे कोल्हेंची नेमकी भूमिका काय? हे समजणे अवघड झाले होते. मात्र आता अजित पवारांनी कोल्हेंना इशाराच देत शिरूर मतदारसंघामध्ये उमेदवार देणार आणि निवडून आणून दाखवणार असल्याचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
अजित पवारांनी काल (25 डिसेंबर) कोल्हेंना इशारा दिल्यानंतर आज ते थेट, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी-सकाळी पाहणी दौऱ्यासाठी पोहचले. या पाहणी दौऱ्यामध्ये अजित पवारांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला आणि प्रशासनाला ते त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले.
यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना कोल्हे आणि त्यांच्या या सकाळच्या दौऱ्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, 'काल अमोल कोल्हेंना दिलेले चॅलेंज आणि आजचा दौरा याचा काही संबंध नाही. हा दौरा पूर्वनियोजित होता. विधानसभेच्या नागपूर अधिवेशनादरम्यान या दौऱ्याबाबत आमदार चेतन तुपे यांनी विचारणा केली होती. त्यावेळी येऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा सकाळी-सकाळी दौरा करण्यात आला आहे. रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून सकाळीच पाहणी करत असल्याचे स्पष्टीकरण यावेळी अजित पवार यांनी दिले.
यानंतर अजित पवार यांना कोल्हे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया विषयी विचारला असता, 'कोल्हे यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाभ. मी जे काल सांगितले ते फायनल असून विषय संपला', असे स्पष्ट करून शिरूरची जागा किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित केले.
अजित पवारांनी काल तुमच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. त्यावर, 'इतक्या मोठ्या नेतृत्वांबद्दल काही बोलणं योग्य नाही. मी फार लहान कार्यकर्ता आहे. यापुढे मी माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला वाटत नाही की, दादांबद्दल मी काही प्रतिक्रिया द्यावी', असे म्हणत यासंदर्भात अधिक बोलणे अमोल कोल्हेंनी टाळले होते.
पाच वर्ष मतदारसंघाकडे फिरकला नाहीत, या अजित पवारांच्या टीकेवर कोल्हे म्हणाले, 'अजितदादांनीच अनेकवेळा माझं कौतुक केलं आहे. यामध्ये काही मिस कम्युनिकेशन झालं असेल. मग अगोदर काम केलं नसतं तर कोरोनाकाळात एवढं मोठं लसीकरण झालं नसतं. पण अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्यांला मी उत्तर द्यावं, असं मला वाटत नाही, असे अमोल कोल्हे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.