Amol Kolhe
Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Amol Kolhe : मी स्टार प्रचारकांत आहे का? आताच कळलं; कोल्हेंच्या विधानाने पुन्हा भुवया उंचावल्या

सरकारनामा ब्युरो

By poll election : सध्या कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीने संपूर्ण वातावरण तापलं आहे. भाजपने या निवडणुकीसाठी ४०, राष्ट्रवादीने २१ तर काँग्रेसने २० जणांची स्टार प्रचारक म्हणून नावे जाहीर केली आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही पुण्यात येणार आहेत. यातून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येत आहे. या घडामोडींबाबत दिल्लीत असल्याने राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे अनभिज्ञ होते.

पुण्यात येताच खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाराष्ट्र, पोटनिवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आले. मात्र संससेदत व्यस्त असल्याचे सांगून काही घडामोडींबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले.

कोल्हे पोटनिवडणुकीबाबत (By-Election) म्हणाले की, येथील सर्व गोष्टी मी दिल्लीत असताना घडल्या आहेत. पोटनिवडणुकीतील बंडखोरीबाबबत कोल्हे म्हणाले, "कसबा, चिंचवडमध्ये झालेल्या गोष्टी मी दिल्लीत असताना घडल्या आहेत. लोकशाहीमध्ये सगळ्यांना निवडणूक लढविण्याचे स्वातंत्र्य आहे. राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी अपक्ष निवडणूक लढविली आहे. त्याबाबत अजित पवार (Ajit Pawar) आणि इतर नेत्यांनी निर्णय घेतला आहे. आता माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय बोलणार?"

यानंतर त्यांना निवडणुकीतील प्रचाराबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी "कसबा, चिंचवडमध्ये सभा घेण्याबाबत मला माहिती नाही. मी स्टार प्रचारक आहे हे मला आत्ताच कळलं आहे," असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने तेथील उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प मार्गी लागल्याबाबत कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, "पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास रेल्वे मंत्री यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. हे पुणे-अहमदनगर-नाशिक जिल्ह्यासाठी दिलासा देणारा आहे. गेल्या ५० वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण होत आहे." यानंतर त्यांनी या प्रकल्पाच्या श्रेयवादाबाबतही भाष्य केले. पुढे कोल्हे म्हणाले, "याचे श्रेय ज्याला घ्यायचे आहे, त्याला लख लाभ. फक्त या गोष्टीला राजकीय रंग देऊ नका."

कोल्हे यांची भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान त्यांनी अर्थसंकल्पाबाबतही सावध भूमिका घेतली होती. भाजप प्रवेशाबाबत कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले, "लोकशाहीमध्ये आता राजकारणाचा पोत बदलत आहे. संसदेतील भाषणाबाबत अजूनही लोकांना प्रश्न पडत असेल तर माझे संसदेतील पूर्ण भाषण ऐकावे. माझ्या संसदेच्या भाषणात 'कभी खुशी कभी गम आहे का?' हे तुम्हाला कळेल", असंही कोल्हे म्हणाले.

पुणे, नाशिकमध्ये कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. त्याबाबत विचारले असता त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काळजी व्यक्त केली. तसेच जो कोणी कोयता गँग नाही असे म्हणतो, ते संशयास्पद आणि दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. तसेच गृहमंत्री यांनी याबाबत सखोल तपास करावं आणि नंतर बोलावे असा टोलाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या वक्तव्यावर, संसदेत असल्याने ते काय बोलले याबाबत मला माहीत नसल्याचे कोल्हे यांनी सांगितले. दरम्यान आमचे नेते राज्याच्या सर्वोच्च पदावर बसणे ही कार्यकर्त्यांनी अपेक्षा आहे. त्यात काहीही गैर नाही, असंही कोल्हे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत बोलले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT