Pimpri Chinchwad : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या 4 डिसेंबरपासून आपल्या मागण्यांसाठी संपावर आहेत.त्यांनी सोमवारी त्यासाठी (ता.11) भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यालयावर मोर्चा काढला.पण, पक्षाच्या महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे या स्वत मोर्चाच्या सामोरे गेल्या. त्यात सामीलही झाल्या. त्यांचे निवेदन स्वीकारले. परिणामी हा मोर्चा अर्ध्यावरच थांबला. कार्यालयावर तो न आल्याने भाजपची होणारी नामुष्की टळली.
सरकारी कर्मचारी म्हणून सेवेत घेऊन मानधनात वाढ करावी या मागणीसाठी राज्यातील एक लाख अंगणवाड्या बंद करून तेथील सेविका आणि मदतनीस या बेमूदत संपावर गेल्या आहेत.गेल्या पन्नास वर्षापासून त्या मानधनावर काम करत असून गेली दहा वर्षे त्यात वाढ झालेली नाही.
दरम्यान,त्यांच्या संपामुळे राज्यातील 35 ते 40 लाख बालके ही पोषक आहारापासून वंचित राहण्यास सुरवात झाली आहे.केंद्र सरकारची ही योजना असून तेथे व राज्यातही भाजप सत्तेत आहे. म्हणून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी शहर भाजप कार्यालयावर हा मोर्चा काढला होता,असे राज्य अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार आणि पिंपरी-चिंचवड अध्यक्षा शैलजा चौधरी य़ांनी सरकारनामाला सांगितले.
भाजप(BJP) कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे पत्र राज्य अंगणवाडी सभेने ९ तारखेलाच स्थानिक पिंपरी पोलिसांना दिले होते. मात्र, त्यांनी परवानगी नाकारली.तरीही मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, त्याची माहिती मिळताच सुजाता पालांडे (Sujata Palande) यांनी हुशारी दाखवली.त्या स्वत या महिला मोर्च्याला सामोऱ्या गेल्या.त्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. एवढेच नाही,तर हा प्रश्न शहरातील आपल्या पक्षाच्या विधान परिषद सदस्या उमा खापरे यांनी राज्य विधीमंडळाच्या गेल्या अधिवेशनात उपस्थित केला होता, याकडे लक्ष वेधले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात तो पुन्हा आपल्या शहरातील आमदारांमार्फत मांडू,असे आश्वासन दिले.त्यामुळे भाजपच्या पक्ष कार्यालयापासून अर्ध्या वाटेवरच मोर्चा थांबला.त्यामुळे पक्षाची नाचक्की होण्यापासून त्यांनी वाचवलीच.शिवाय परवानगी नाकारून मोर्चा काढला म्हणून अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) आणि मदतनीसांवरील पोलिसांची कारवाईही टळली.
अंगणवाडी ही केंद्राची योजना 1975 ला सुरु झाली तेव्हा त्यात त्यांचा 90 ,तर राज्याचा वाटा दहा टक्के होता. सध्या तो फिफ्टी फिफ्टी आहे. दरम्यान,त्यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना दीडशे आणि 75 रुपये मानधन होते. सध्या ते दहा हजार आणि साडेपाच हजार रुपये आहे. ते 26 हजार आणि 18 हजार करावे,अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सरकारी कर्मचारी घोषित करून त्यांना ग्रॅच्युएटी,पीएफ,पेन्शन द्यावे या सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी हा राज्यव्यापी बंद तथा संप पुकारण्यात आलेला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.