Anup More
Anup More Sarkarnama
पुणे

पिंपरी भाजपतील निष्ठावंतांना मानाचे पान; खापरे, गोरखेंनतर अनुप मोरेंकडे मोठी जबाबदारी

उत्तम कुटे

पिंपरी : भाजप (BJP) युवा मोर्चाचे (भाजयुमो) प्रदेशाध्यक्ष पनवेलकर (जि. रायगड) विक्रांत पाटील यांना पक्षाने नुकतेच प्रदेश महामंत्री केले. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लातूरचे राहुल लोणीकर यांना आज (ता. १५ ऑक्टोबर) संधी दिली. `भाजयुमो`च्या या फेरबदलात पिंपरी-चिंचवडलाही (Pimpri-chinchwad) मानाचे पान मिळाले आहे. भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस म्हणून पिंपरी-चिंचवडमधील अनुप मोरे (Anup More) यांची नियुक्ती केली आहे. (Anup More has been elected as State General Secretary of Bharatiya Janata Party Yuva Morcha)

पिंपरी-चिंचवड महापालिकेची तोंडावर आलेली सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन भाजपने पिंपरी महापालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी जोरात प्रयत्न सुरु केले आहेत. त्याची तयारी म्हणून शहरातील पक्ष पदाधिकाऱ्यांना प्रदेशवर संधी दिली जात आहे. त्यातही मूळ आणि एकनिष्ठांना आवर्जून प्राधान्याने ती देण्यात येत आहे.

महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना पक्षाने नुकतेच विधान परिषदेवर आमदार केले. त्याअगोदर पक्षाचे पिंपरी पालिकेतील माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांना प्रदेश प्रवक्तेपदी बढती दिली. तर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवडमधील भाजपचा आणखी एक तरुण चेहरा अमित गोरखे यांना पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून नियुक्त केले.

पिंपरी महापालिका निवडणुकीची तयारी पुढे चालू ठेवताना `भाजयुमो`चे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांना भाजयुमो`चे प्रदेश सरचिटणीस तसेच पक्षाच्या युवा वॉरियर्सचे प्रदेश संयोजक म्हणून आज बढती पक्षाने दिली. ते शहराच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे यांचे चिरंजीव आहेत. पक्षाने दाखविलेला हा विश्वास सार्थ ठरवेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी `सरकारनामा `ला या नियुक्तीवर दिली. राज्यातील युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त युवा वॉरियर्सच्या शाखा राज्यात उघडून युवकांना युवा मोर्चात सहभागी करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, महापालिका निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, तर त्यात पिंपरी-चिंचवडला राज्यमंत्रीपदही भाजप देण्याची दाट शक्यता असल्याची चर्चाही आहे. त्यामुळे शहराचा मंत्रीपदाचा बॅकलॉग भरून निघणार आहे. त्याजोडीने महामंडळ नियुक्त्यांतही पिंपरी-चिंचवडला वाटा देण्याची मागणी शहर पक्षातून होत आहे. शिवाय महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्याही निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला पुणे जिल्ह्यात बळ मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT