Pune News : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यात मोठी कारवाई करत कोंढवा परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. त्याचे अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातील अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव झुबेर हंगरकर असे असून, तो कोंढवा परिसरात वास्तव्यास होता. उच्चशिक्षित आणि आयटी क्षेत्रात लाखो रुपयांचे पॅकेज घेणारा हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा आहे आणि मागच्या 15 वर्षांपासून तो पुण्यातील मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यात कार्यरत होता. तसेच सध्या कल्याणीनगर येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत सिनीअर QA Analyst पोस्ट काम करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार UAPA (Unlawful Activities Prevention Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून ATS या संशयितावर लक्ष ठेवून होती. गुप्त माहितीच्या आधारे पुण्यातील कोंढवा भागात सोमवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान संशयिताच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली असून, त्यातून काही डिजिटल डिव्हाइस, मोबाईल, तसेच संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्राथमिक चौकशीतून असे समोर आले आहे की झुबेर हंगरकर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही परदेशी दहशतवादी संघटनांशी संपर्कात होता. त्याच्याकडून काही संवेदनशील माहिती शेअर केली जात असल्याचा संशय आहे. तसेच तो काही तरुणांना कट्टरपंथी विचारसरणीकडे वळविण्याचा प्रयत्न करत होता, अशीही शक्यता तपासली जात आहे.
एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर रोजी पुण्यातील विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईदरम्यान 19 लॅपटॉप आणि 40 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तपासादरम्यान हंगरगेकरच्या लॅपटॉपमध्ये अल-कायदा संघटनेशी संबंधित साहित्य, लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर, तसेच ‘अल-कायदा इन्स्पायर’ मासिकातील एके-४७ रायफलने गोळीबार करण्याच्या आणि बॉम्ब बनवण्याच्या पद्धतींची माहिती आढळून आली. असे साहित्य डाउनलोड करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे एटीएस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, चेन्नईहून परत आल्यानंतर हंगरगेकरच्या एका मित्रालाही संशयाच्या आधारे पुणे रेल्वे स्थानकावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडील मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही तपासणी केली जाणार आहे. हंगरगेकरकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे तो आणखी किती कट्टरतावादी तरुणांच्या संपर्कात होता आणि त्याने अल-कायदासाठी कोणाला प्रोत्साहित केले का, याचा सखोल तपास सुरू आहे.
पुणे न्यायालयाने आरोपीला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा डिजिटल फॉरेन्सिक तपास सध्या सुरू असून, त्यातून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे.
दरम्यान, एटीएसने या महिन्याच्या सुरुवातीला शहरातील विविध भागांत सर्च ऑपरेशन राबवले होते. हे ऑपरेशन आयसिस (ISIS) मॉड्यूलशी संबंधित तपासाचा भाग होते. त्यावेळी संशयित कट्टरपंथी व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले होते आणि 19 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. तथापि, सखोल चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. एटीएसकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, हंगरगेकरचा दहशतवादी संघटनांशी प्रत्यक्ष संबंध होता का, यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणातील अधिक तपशील अद्याप उघड करण्यात आलेले नाहीत. मात्र, या अटकेनंतर पुणे आणि परिसरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ATS च्या अधिकाऱ्यांनी संशयिताला न्यायालयात हजर करून त्याचा पोलीस कोठडी मागितली आहे. तपासादरम्यान त्याचे इतर कोणत्या व्यक्तींशी संबंध आहेत, तसेच महाराष्ट्रात किंवा देशभरात कोणते मोठे कट रचले जात होते का, याबाबत सखोल तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.