Bageshwar Baba Clash : Sarkarnama
पुणे

Bageshwar Baba Clash : बागेश्वर बाबांच्या दरबारात तुफान हाणामारी; राड्याचा व्हिडिओ व्हायरल...

Bageshwar Baba Clash Between Bhakts : बाबांच्या स्वयंसेवकांकडून भाविकांना पुढे जाण्यासाठी मज्जाव...

Chetan Zadpe

Pune News : धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रमात बाबांचे स्वयंसेवक व भाविकांमध्ये वादावादी झाल्याचे प्रकार घडले. भाविकांच्या अंगावर धावून जात स्वयंसेवकांनी काही भाविकांना हाणामारी केल्याचे समोर आले. बंदोबस्तावरील पोलिसांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रसंग टळला. दरम्यान, बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात झालेल्या या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेले बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रशास्त्री (बागेश्वर बाबा) पुणे दौऱ्यावर आहेत. माजी आमदार जगदीश मुळीक फाउंडेशनतर्फे बागेश्वर बाबा यांच्या तीनदिवसीय 'हनुमान सत्संग कथा' व 'दिव्य दरबार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संगमवाडी येथे हा कार्यक्रम होत आहे. यासाठी बाबांच्या भक्तांची मंगळवारी मोठी गर्दी झाली होती.

कार्यक्रमाच्या आयोजकांनी 'व्हीआयपी' व 'व्हीव्हीआयपी' पासचे सरसकट वाटप केले होते. त्यामुळे कार्यक्रमाच्या व्यासपीठाजवळ जाण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ सुरू होती. त्यातून कार्यक्रम स्थळावरच्या स्वयंसेवकांसोबत वादावादीचे प्रकार घडत होते. आपल्याकडे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी पास असल्याने व्यासपीठाजवळ जाण्यासाठी प्रत्येक जण आग्रही होते. बाबांच्या स्वयंसेवकांकडून भाविकांना पुढे जाण्यासाठी मज्जाव केला जात असल्याने उपस्थित नागरिकांमध्ये आणि स्वयंसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडत होती.

काही स्वयंसेवक थेट भाविकांच्या अंगावर धावून गेल्याने किरकोळ हाणामारीचे प्रकारही घडले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी वेळीच यामध्ये हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला. आमच्याकडे व्हीआयपी प्रवेश पत्रिका असतानाही कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले स्वयंसेवक विनाकारण मनमानी करत कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांशी वाद घालून धक्काबुक्की करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

वादग्रस्त विधाने आणि बागेश्वर बाबा हे समीकरण

वेगवेगळ्या प्रकारची वादग्रस्त विधाने करून बागेश्वर बाबा नेहमी चर्चेत असतात. संत तुकाराम महाराज, शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत बागेश्वर बाबा यांनी चुकीची विधाने केली होती. त्यानंतर त्यांनी जाहीर माफीदेखील मागितली होती. भारत हिंदू राष्ट्र करण्यासाठी संविधान बदलण्याची भाषादेखील बागेश्वर बाबा यांनी केलेली आहे. बागेश्वर बाबा हे सत्संग आणि दरबाराच्या माध्यमातून अशास्त्रीय वक्तव्ये करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. अंधश्रद्धा वाढविणारी वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबांवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT