Baramati Dudh Sangh Eelection Sarkarnama
पुणे

Baramati Dudh Sangh Election: बारामतीत अजित पवारच ‘दादा’...दूध संघावर पुन्हा फडकावला राष्ट्रवादीचा बिनविरोध झेंडा...

बारामती दूध संघाची गेल्या अनेक वर्षांपासून निवडणूक बिनविरोधची परंपरा या वेळीही कायम राहिली आहे.

कल्याण पाचांगणे

Malegaon : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती सहकारी दूध संघावर पुन्हा एकदा बिनविरोधचा झेंडा फडकावला आहे. दूध संघाच्या पंचावार्षिक निवडणुकीत १९ जागांसाठी १९ संस्था प्रतिनिधींनीच उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल केले आहेत, त्यामुळे त्यांनी बिनविरोध निवड झाली आहे. त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. (Baramati Dudh Sangh election unopposed)

बारामती (Baramati) दूध संघाच्या निवडणुकीसाठी (Dudh Sangh) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (शुक्रवारी, ता. २ जून) शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसांपर्यंत केवळ १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. हे सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तथा अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विचाराचे आहेत. संघाच्या १९ जागांसाठी १९ अर्ज आल्याने बारामती दूध संघाची निवडणूक यंदाही बिनविरोध झाली आहे. त्यामुळे संघावर अजितदादांचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर खंबायत यांनी ही माहिती दिली.

अजित पवार यांच्या सूचनेनुसार आज राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी पक्षाच्या १९ जणांची अधिकृत उमेदवार यादी प्रसिद्ध केली. त्या यादीमध्ये बारामती दूध संघाचे मावळते अध्यक्ष संदीप हनुमंत जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र दत्तात्रेय रायकर यांच्यासह संचालक संजय रामचंद्र कोकरे, सतिश हरिश्चंद्र पिसाळ, संजय ज्ञानदेव देवकाते यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

सर्वसाधारण मतदार संघासाठी १४ जागा आहेत. त्यामध्ये संदीप हनुमंत जगताप (कुरणेवाडी), संजय तुकाराम शेळके (काटेवाडी), प्रशांत दत्तात्रेय खलाटे (लाटे), श्रीपती शंकर जाधव (डोर्लेवाडी), संतोष मारूती शिंदे (मुर्टी), दत्तात्रेय सदाशिव वावगे (सोनवडी सुपे) , शहाजी जिजाबा गावडे (मळद), पोपट सोमनाथ गावडे (कऱ्हावागज), संजय रामचंद्र कोकरे (पणदरे) , सतिश हरिश्चंद्र पिसाळ (फोंडवाडा), बापुराव तुकाराम गवळी (उंडवडी सुपे), नितीन विश्वास जगताप (वाकी), किशोर भगवान फडतरे (सिद्धेश्वर निंबोडी), संजय ज्ञानदेव देवकाते (नीरावागज) यांचा उमेदवारीमध्ये समावेश आहे.

अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधीसाठी १ जागा असून येथे सुशांत महादेव जगताप यांनी संधी दिली. महिला प्रतिनिधीसाठी २ जागा असून त्यात स्वाती मोहन खामगळ (ढाकाळे), शोभा गोरख जगताप (वडगाव निंबाळक) यांचा समावेश आहे. इतर मागास वर्गीय प्रतिनिधीसाठी १ जागा असून राजेंद्र दत्तात्रेय रायकर (काऱ्हाटी) यांची वर्णी लागली आहे. भटक्या विमुक्त जाती-जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीसाठी १ जागेवर पुरूषोत्तम शिवाजी गाढवे (आंबी खुर्द) यांचे एकमेव नाव उमेदवार यादीमध्ये पुढे आले.

दरम्यान, अजित पवार सर्वेसर्वा असलेल्या बारामती दूध संघाची गेल्या अनेक वर्षांपासून निवडणूक बिनविरोध झाल्याची नोंद आहे. बिनविरोधची परंपरा या वेळीही कायम राहिली आहे.

संभाजी होळकरांनी सांगितले बिनविरोधचे गुपित

सहकार, विकास आणि त्यातून शेतकऱ्यांची समृद्धी बारामती दूध संघाने साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आजी माजी संचालक मंडळासह अधिकारी, कामगारांचे योगदान महत्वपूर्ण ठरते. इच्छुक उमेदवार अजित पवारांचे नेतृत्व मान्य करतात आणि संघाची निवडणूक परंपरेनुसार बिनविरोध होते, असे बिनविरोधचे गुपित राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT