Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar Birthday : साहेबांचा वाढदिवस; पण बारामती राष्ट्रवादीच्या कार्यालयात शुकशुकाट !

NCP Baramati : राज्याचे अजित पवारांच्या सोशल मीडियाकडे लक्ष..

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : बारामती आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे समिकरण कायम असल्याचे म्हटले जाते. शरद पवारांचा वाढदिवस म्हणजे बारामतीकरांसाठी दिवाळीच! दरवर्षी, चौकाचौकात साहेबांना शुभेच्छा दिल्याचे फलक झळकतात. विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. राष्ट्रवादी भवनात तालुक्यातील कार्यकर्त्यांची राबता असतो. यावर्षी मात्र बारामती शहरात चित्र वेगळेच पाहायला मिळाले. राष्ट्रवादी भवनासह शहरातील सर्व चौक सुने पडले होते. ही बाब सामान्य बारामतीकरांच्या मनाला चटका लावणारी ठरली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड करून सत्तेत सहभागी झाले. यानंतर राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शरद पवार किंवा अजित पवार गट निवडले. मात्र बारामतीतील पदाधिकाऱ्यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात राहिल्याचे दिसून येते. पक्षात बंड झाल्यानंतर असलेल्या पवारांच्या वाढदिवशी बारामतीत चित्र बदलल्याचे दिसून आले.

दरम्यान, बारामतीत शरद पवार गटाच्या नवनियुक्त आणि सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांसह काही मोजक्या मंडळींनी केक कापून शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला. मात्र कालपर्यंत पवारांचे विश्वासू, जवळचे म्हणून मिरवणाऱ्या तालुक्यातील नेत्यांनी पवारांना उघड उघड शुभेच्छा देण्याचे टाळल्याचे दिसून आले. यावर पवारांच्या नावाने मोठे झाले ते कृतघ्न झाले का, असा प्रश्न बारामतीकर उपस्थित करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांच्या सोशल मीडियाकडे लक्ष..

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या सोशल मीडियावर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत. मात्र अजित पवारांच्या सोशल मीडियावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उघडपणे शुभेच्छा दिलेल्या दिसत नाहीत. याबाबतही राज्यभर चर्चा सुरू आहे.

सुप्रिया सुळेंचा 'संघर्ष योद्धा !'

खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या खास शब्दात पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. "संघर्षाच्या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल, याचा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे. लढेंगे-जितेंगे!" असा निर्धार सुप्रियाताईंनी व्यक्त केला आहे.

"जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय," अशा भावनाही सुळेंनी आपले वडील शरद पवारांच्या वाढदिनी व्यक्त केल्या.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT