Bhima Patas Sugar Factory Election News Sarkarnama
पुणे

Pune News : 15 दिवसांत धुराळा उडणार! पुणे जिल्ह्यातील 'या' निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने येणार?

Bhima Patas Sugar Factory Election News: भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुढील 15 दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदाही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Mangesh Mahale

Pune News: काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यात महायुतीतील दोन मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता.

दौंड तालुक्यात भाजपचा आमदार असताना देखील नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले, तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील दोन्ही पक्षांमधील सामना कमालीचा अटीटटीचा झाला. हाच राजकीय संघर्ष आता पुन्हा एकदा एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. दौंडच्या रणसंग्रामात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना पुन्हा रंगणार असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

दौंड तालुक्याच्या राजकारणातील महत्त्वाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या घडामोडींनी तालुक्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या या भीमा सहकारी साखर कारखान्यावरील संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आल्यामुळे अखेर तिथे प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे.

मंगळवारी प्रादेशिक सहसंचालकांच्या आदेशानुसार प्रकाश जगताप यांची प्रशासक म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आपला पदभारही स्वीकारला आहे. या प्रशासक नेमणुकीनंतर आता आगामी काळात कारखान्याच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता अधिक गडद झाली असून, त्यातून तालुक्यातील दोन प्रभावी राजकीय चेहरे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यात पुन्हा एकदा थेट आणि अटीतटीचा संघर्ष रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. राजकीय वर्तुळात तर आतापासूनच कारखान्याची सत्ता नेमकी कोणाच्या हाती जाणार, यावर जोरदार चर्चा आणि गणिते मांडली जाऊ लागली आहेत.

भीमा-पाटस कारखान्याच्या सर्वसाधारण सभांमध्ये यापूर्वीही अनेकदा आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण तालुक्याने जवळून पाहिला आहे. एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप, कारखान्याच्या धोरणांवरून आणि आर्थिक परिस्थितीवरून झालेली सडकून टीका, सभांमधील जोरदार गदारोळ आणि एकमेकांवर केलेले धारदार राजकीय हल्ले यामुळे भीमा-पाटस कारखाना हा केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित विषय न राहता, तो तालुक्यातील एकूणच राजकीय संघर्षाचे मुख्य व्यासपीठ ठरत गेला आहे.

दौंड तालुक्यातील जनतेनेही अनेक वेळा या कारखान्याच्या कामकाजावरून आणि राजकारणावरून तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघताना अनुभवले आहे. त्यामुळेच, आता झालेली ही प्रशासक नेमणूक हा केवळ एक प्रशासकीय निर्णय नसून, ती आगामी काळातील मोठ्या राजकीय रणधुमाळीची अधिकृत चाहूल असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.

कुल विरुद्ध थोरात

आता येणाऱ्या काळात कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे नवे सत्र आणि चिखलफेक सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे आमदार राहुल कुल यांच्यासमोर विद्यमान नेतृत्वाचे वर्चस्व आणि कारखान्यावरील पकड कायम ठेवण्याचे मोठे आव्हान असेल, तर दुसरीकडे सत्ताधारी कुल गटाला धोबीपछाड देत सत्ताबदलाचे संकेत देणाऱ्या माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांची रणनीती अधिक आक्रमक आणि आखाडी धरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तालुक्याच्या या राजकीय पटावर भीमा कारखान्याची लढत पुन्हा एकदा जुन्याच ईर्षेने तापणार, की यामध्ये काही नव्या समीकरणांची निर्मिती होणार, याकडे आता संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

प्रकाश जगताप यांनी कारखान्याच्या प्रशासकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कारखान्याच्या आगामी निवडणूक प्रक्रियेबाबत सभासदांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी १५ दिवसांच्या आत कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करणे कायदेशीररीत्या अपेक्षित आहे.

उलटसुलट चर्चांना उधाण

प्रादेशिक सहसंचालकांनी जारी केलेल्या आदेशातही या महत्त्वपूर्ण सूचनांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. याच मुद्यावरून आता नव्याने नियुक्त झालेले प्रशासकीय अधिकारी नियमानुसार दिलेल्या १५ दिवसांच्या कालावधीत निवडणुकीची प्रक्रिया खरोखरच सुरू करतात, की अन्य काही प्रशासकीय कारणास्तव अथवा संभाव्य राजकीय दबावामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडते, याबाबत कारखान्याच्या सभासदांमध्ये आणि दौंडच्या राजकीय वर्तुळात सध्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT