Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
पुणे

Maharashtra land scam: तुकडे पाडून छुप्या पद्धतीने जमिनीचे व्यवहार करणाऱ्यांवर होणार सर्जिकल स्ट्राइक; बावनकुळेंचा पुण्यातून थेट इशारा

revenue department action News : कोणत्याही अधिकृत लेआऊट मंजुरीशिवाय जमिनीची विक्री केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : निवासी क्षेत्रातील जमिनींचे तुकडे पाडून छुप्या पद्धतीने व्यवहार करणाऱ्यांवर आता महसूल विभागाचा सर्जिकल स्ट्राईक होणार आहे. ऑक्टोबर 2024 पूर्वीचे जमिनीचे तुकडे सरकारने वैध ठरवले असले, तरी त्यानंतर कोणत्याही अधिकृत लेआऊट मंजुरीशिवाय जमिनीची विक्री केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी भूमाफिया आणि नियमबाह्य व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणतील असा इशारा दिला.

पुणे आणि परिसरात भूसंपादनाची माहिती आधीच फोडून काही व्यापाऱ्यांनी जमिनी लाटल्याचे प्रकार सरकारसमोर आले आहेत. या 'इनसाईड' व्यवहारांची आता गुगल मॅप्स आणि वर्षभरातील नोंदणी व्यवहारांच्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सखोल चौकशी सुरू झाली असून, यात दोषी आढळणाऱ्यांना मदतीचा एक रुपयाही मिळणार नसल्याचे बावनकुळे (Chandrashekhar bawnkule) यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, जमिनीच्या सातबाऱ्यावर 'शुद्धलेखन दुरुस्ती'च्या नावाखाली सातबाराच बदलणाऱ्या तहसीलदारांचेही आता 'काऊंटडाऊन' सुरू झाले आहे. राज्यातील सुमारे दोन हजार तहसीलदारांच्या कामकाजाचे पुनर्विलोकन सुरू असून, कलम 155 चा गैरवापर करून करण्यात आलेल्या चुकीच्या नोंदी रद्द केल्या जाणार आहेत. पुण्यातील40 संशयास्पद अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

राज्यात जमिनीच्या मालकी हक्काबाबत पारदर्शकता आणण्यासाठी सरकार येत्या जुलैपासून 'लॅण्ड टायटलिंग ऍक्ट' लागू करण्याच्या तयारीत आहे. सध्याचा सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड हा केवळ नोंदणीचा पुरावा आहे, तो अंतिम मालकी दर्शवत नाही. मात्र, या नवीन कायद्यामुळे नागरिकांना जमिनीचा निश्चित मालकी हक्क मिळणार असून, मध्यस्थांची साखळी मोडीत निघणार आहे, असा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असा दावाही त्यांनी केला.

त्यासोबतच देवस्थान जमिनींच्या वादावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की, 100 वर्षांपासून वहीवाट असलेल्या जमिनींबाबत सरकार लवकरच निश्चित धोरण आणणार असून, देवस्थानांचे हक्क अबाधित ठेवून वहिवाटदारांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT