Chhagan Bhujbal-Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Chhagan Bhujbal : नाराज भुजबळांचा परदेशवारीनंतरचा पहिला कार्यक्रम थोरल्या पवारांसोबत; राजकीय चर्चांना उधाण!

Chhagan Bhujbal-Sharad Pawar will Come Together : चाकण येथील कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि खासदार अमोल कोल्हे हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Vijaykumar Dudhale

Pune, 02 January : राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे परदेश दौऱ्यावर परतले असून त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज असलेले भुजबळ हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत जाणार, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली होती. त्याच अनुषंगाने पावले पडताना दिसत आहेत. भुजबळ हे पवारांसोबत एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. राष्ट्रवादीचा पहिला कार्यक्रमही भुजबळांच्या संस्थेतच झाला होता. याशिवाय समीर भुजबळ यांच्याकडे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सोपविण्यात आली होती. मात्र विधानसभेतील यशानंतर नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान मिळू शकलेले नाही, त्यामुळे नाराज भुजबळ यांनी हिवाळी अधिवेशन सोडून तातडीने नाशिक गाठले होते.

नाशिकमध्ये ओबीसींच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी जाहीरपणे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला होता. मात्र, पवारांनी त्यांना अद्याप कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही. भुजबळांच्या नाराजीवर त्यांनी मौन बाळगले आहे. पण भुजबळांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी भुजबळांना दहा दिवसांनंतर भेटण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

दरम्यान, परदेशातून परतल्यानंतर भुजबळ यांचा पहिला कार्यक्रम हा शरद पवार यांच्यासोबत असणार आहे. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भुजबळ आणि शरद पवार एकत्र येणार आहेत. नाराजीनंतर भुजबळ यांचा पहिलाच राजकीय कार्यक्रम असणार आहे. तोही नव्या वर्षातील पहिला कार्यक्रम हा पवारांसोबत असणार आहे, हे विशेष.

चाकण येथील कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि खासदार अमोल कोल्हे हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या भुजबळांचा शरद पवारांसोबतच्या प्रथमच कार्यक्रम होत आहे. भुजबळांसोबत मंत्रिमंडळात स्थान मिळालेले दिलीप वळसे पाटील हेही एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT