Prithviraj Chavan
Prithviraj Chavan sarkarnama
पुणे

समविचारींचे नेतृत्व काँग्रेसने करावे; अन्यथा पुढील प्रवास खडतर...

मीनाक्षी गुरव

पुणे : ''आगामी काळात येणाऱ्या राजकीय परिस्थितीत सर्व समविचारी पक्षांना एकजूट करण्याची गरज असून त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यायला हवा. देशात व्यापक समविचारी पक्षांची आघाडी होणे आणि पर्यायी विरोधी पक्ष उभा करण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. आता काँग्रेस पक्षाने लोकशाही बळकट करून नेतृत्व करायची भूमिका घेतली नाही, तर पुढील प्रवास खडतर असून त्याचीच चिंता वाटते,'' असे परखड मत मांडत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीपाल सबनीस लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणीत सामाजिक क्रांती’ या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी झाले. यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही टिकविण्यासाठी तयार केलेली चौकट म्हणजे संविधान आहे. आणि ही लोकशाही टिकविण्याची दुसरी सामाजिक क्रांती आपल्याला करावी लागणार आहे. सध्या भारतीय राज्यघटनेला सुरुंग लावण्याचे काम सुरू असून हा धोका निर्माण झाला आहे. राजकीय पक्ष हे संसदीय लोकशाहीचा आधार आहेत. राजकीय पक्ष संघटना दुर्बल होणे, ही चिंतेची बाब आहे.’’

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘‘संपूर्ण देशात चातुवर्ण्य व्यवस्था येतोय की काय, अशी भीती वाटत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक समतेवर आधारित चळवळ उभी करावी लागणार आहे. बाबासाहेबांनी विचारांची लढाई लढविली आणि त्यातून समाज क्रांती झाली. आता तरुण पिढीला आत्मचिंतन करण्याची गरज असून विचारांचे शस्त्र घेऊन उभे राहिले पाहिजे.’’

‘‘राजकीय पक्ष हे ध्येयापासून दूर जात असतील, तर लेखक, वाचक, नागरिकांनी काय करावे. महापुरूषांना घातलेली जातीची, धर्माची जानवे आता जाळावी लागतील. महापुरुष हे डावे-उजवे, जाती-धर्माचे नसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नाहीत, तर ते मानवतावादी विचारांचे आहेत.’’

- डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT