Pooja Khedkar  sarkarnama
पुणे

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल, कारण...

Pooja Khedkar : मुळशी तालुक्यातील धडवली गावात खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली होती. ती ताब्यात घेताना शेजारील शेतकऱ्यांच्या जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न मनोरमा खेडकर यांनी केला होता.

Chaitanya Machale

Pune News : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रूबाब करणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. पौड पोलिस स्टेशनला पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे येणाऱ्या काळात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला शिवीगाळ, मारहाण , धमकाविणे तसेच दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत शेतकऱ्यांवर पिस्तूल रोखल्याच्या आरोपांच्या कलमांखाली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पूजा यांचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा यांच्याबरोबर अंबादास खेडकर आणि अनोळखी दोन महीला, दोन पुरुष आणि गुडांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी पूजा यांच्या आईने मुळशी मधील शेतकऱ्याला धमकी देत त्यावर पिस्तूल रोखल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर संबधित शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयात आयएएस अधिकारी म्हणून निवड झालेल्या पूजा खेडकर यांची गेल्या वर्षी प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. ही निवड झाल्यानंतर रूजू होण्यापूर्वीच खेडकर यांनी आपल्या पदाचा रूबाब दाखविण्यास सुरुवात केली. बसण्यासाठी अत्यावश्यक सोयीसुविधांयुक्त केबीन, राहण्यासाठी निवास, दिमतीला कर्मचारी अशी मागणी त्यांनी सुरु केली.

इतकेच नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालयात काम करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनवर परस्पर ताबा मारत त्यांनी तेथे बेकायदेशीर पद्धतीने आपला कार्यालय देखील सुरू केले होते. अधिकारी, कर्मचारी यांना जाब विचारणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार त्यांनी केले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांची तक्रार राज्य सरकारकडे करत त्यांच्या वागणुकीचा अहवाल पाठविला होता.

जिल्हाधिकारी दिवसे यांनी त्यांना इतर जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी पाठवावे, अशी विनंती देखील राज्य सरकारला पाठविलेल्या अहवालामध्ये केली होती. त्यानंतर राज्य सरकारने त्यांची बदली वाशिमला केली आहे. ही बदली झाल्यानंतर त्यांचे अनेक उद्योग समोर आले आहेत. एका गुन्ह्यात अडकलेल्या नातेवाईकाला सोडविण्यासाठी मुंबई येथील पोलिस (Police) उपायुक्तांना फोन करून त्यांच्यावर पूजा खेडकर यांनी दबाब टाकल्याचेही समोर आले आहे. त्यांच्या आई मनोरमा यांनी देखील गेल्या वर्षी मुळशी येथील एका शेतकऱ्याला दमदाटी करत त्याच्यावर पिस्तूल रोखल्याचा व्हिडीओ समोर आला होता.

मुळशी तालुक्यातील धडवली गावात खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली होती. ती ताब्यात घेताना शेजारील शेतकऱ्यांच्या जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न मनोरमा खेडकर यांनी केला. याला शेतकऱ्यांना विरोध केला, तेव्हा मनोरमा खेडकर या 'बाउन्सर' घेऊन तिथे पोहोचल्या.

यावेळी मनोरमा खेडकर यांनी हातात बंदुक घेऊन शेतकऱ्यांना धमकाविले. याबाबत संबधित शेतकऱ्यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पण, त्यावेळी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. याबाबतच्या बातम्या प्रसारमाध्यमात आल्यानंतर शुक्रवारी संध्यकाळी पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पंढरीनाथ कोंडीबा पासलकर, 65 वर्षे रा. मु पो केडगाव (आंबेगाव पुनवर्सन ) ता.दौड जि. पुणे यांनी ही तक्रार दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT