Dattatreya Ware-Bacchu Kadu  Sarkarnama
पुणे

पुणे झेडपीने निलंबित केलेले वाबळेवाडी शाळेचे वारे गुरुजी बनले मंत्र्यांचे ओएसडी!

भरत पचंगे

शिक्रापूर (जि. पुणे) : कामात हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा म्हणून पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केलेले वाबळेवाडी (Wablewadi) जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे (Dattatreya Ware) यांच्या चौकशीत काहीही निष्पन्न न झाल्याने झेडपीला त्यांचे निलंबन मागे घ्यावे लागले. याचदरम्यान वारे गुरुजींचा जवळून संपर्क आलेले आणि त्यांच्यामागे भक्कम उभे राहिलेले शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मात्र निलंबन मागे घेताच वारे गुरुजींना थेट आपल्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) म्हणून सेवावर्ग करून घेण्याचा निर्णय घेतला. (Dattatreya Ware Guruji of Wablewadi appointed Minister of State for Education Bacchu Kadu as OSD)

याबाबतच्या पत्राची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही तत्काळ दखल घेत वारेंना सेवामुक्त करण्याचा आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना नुकतेच दिले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक वारे गुरुजी आता थेट राज्याच्या शिक्षण मंत्रालयात मंत्र्यांचे ओएसडी म्हणून रुजू होणार आहेत.

सन २०१२ मध्ये फक्त ३२ विद्यार्थीसंख्या असलेली द्विशिक्षकी ते राज्यातील १५०० शाळांसाठी मॉडेल अशी ओळख मिळविलेली वाबळेवाडीची शाळा असा प्रवास वारे गुरुजींच्या माध्यमातून झाला आहे. वाबळेवाडी शाळेचे सबकुछ असलेले मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांच्या कामकाजाची चौकशी करण्याच्या प्रकाराने संपूर्ण राज्यातून नाराजी व्यक्त केली गेली. तब्बल सहा महिन्यांच्या चौकशीनंतर मागील आठवड्यात त्यांना क्लिनचिट मिळताच त्यांना खेड तालुक्यात रुजू करुन घेण्यात आले. मात्र वारेंचा पुढचा प्रवास नेमका काय व कसा याबद्दल राज्यभर कुतुहल होते.

खेडमधील अनेक गावांनी ग्रामसभा घेऊन वारे गुरुजींची मागणी केली होती, तर वाबळेवाडीतील पालक आंदोलनाच्या पवित्र्यात असतानाच शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांना आपल्या मंत्रालयात विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) म्हणून सामावून घेण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयाच्या अनुषंगाने त्यांनी आपले पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. मुश्रीफ यांनीही वारे यांना तत्काळ सेवामुक्त करण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ यांना दिले. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यवाहीनंतर गेल्या सहा महिन्यांपासून खोट्या आरोपांमध्ये अडकवून हैराण केलेल्या वारे यांना अखेर त्यांच्या कामाची पावती मिळाली आहे. त्यांना आता थेट शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयात सामावून घेण्याची बक्षीसी तर मिळणारच आहे. शिवाय राज्यभरातील शाळांसाठी वाबळेवाडी पॅटर्न राबविण्याची संधी सरकारी स्तरावर देण्यात आल्याचे राज्यमंत्री कडू यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना तुमची गरज : बच्चू कडू

एक शाळा आठ वर्षांत जागतिक दर्जाला पोचविण्याचे आपले समर्पण, गुणवत्ता, नवनवीन कल्पना वास्तवात राबविण्याची आपली हातोटी एकाच शाळेत का आपण अडकवून ठेवायची आहे. राज्यातील लाखो गुणवंत विद्यार्थ्यांना तुमची गरज आहे. तुम्ही आता माझ्यासोबत काम करायचे. एवढे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आणि मला मोठ्या स्तरावर काम करण्याची त्यांनी संधी दिली. झाले गेले विसरून नवीन काय करता येईल, याची योजनाही मी बनवून ठेवली आहे. पुढील काळात राज्यासाठी काही नाविन्यपूर्ण करून दाखवायचे आहे, एवढेच सध्याचे तरी माझे स्वप्न आहे, असे वाबळेवाडी शाळेचे माजी मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT