1 सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने पुणे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
2 भाजपने मागील काही वर्षांत पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांवर वर्चस्व वाढवले असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग सुरू केले आहे.
3 ‘जनसंवाद’ आणि ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ या कार्यक्रमांतून अजित पवार थेट नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटना मजबूत करत आहेत.
Pune, 21 September : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानेच अल्टिमेटम देत चार महिन्यांच्या कालावधीत निवडणूक घेण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामुळे पुढील चार महिन्यांमध्ये या निवडणुका होणार, हे निश्चित झाल्याने आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. होम ग्राउंड असलेल्या पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ‘मायक्रो प्लॅनिंग’ सुरू केले आहे.
अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक रणनीतीस बालेकिल्ल्यात सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे जिल्हा हा बालेकिल्ला मानला जातो. पुणे जिल्ह्यात येणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलं होतं. मात्र, मागील काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसची पकड काहीशी सैल झाली असून भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर मागील निवडणुकीमध्ये भाजपने आपला झेंडा रोवला आहे. अस असलं तरी पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) एकहाती सत्ता राहिली आहे. मात्र, मागील काही काळापासून भाजपने या भागातील आघाडीतील नेते आपल्याकडे घेत पक्षाचे वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली आहे.
एक प्रकारे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यांमध्येच भाजपने मोठी ताकद उभारण्याचा प्रयत्न चालवला आहे. आता अजित पवार यांच्याकडूनही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या भागात आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 'जनसंवाद' आणि 'राष्ट्रवादी परिवार मिलन' या दोन कार्यक्रमाची आखणी करण्यात केली आहे. यात जनसंवाद कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांसह थेट लोकांना भेटून त्यांचे प्रश्न सोडविणार आहेत.
राष्ट्रवादी परिवार मिलन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या थेट घरी जाऊन जेवण, अल्पोपहार घेत आहेत आणि कार्यालयांना भेट देऊन संघटना मजबूत करण्याचं काम करत आहेत. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून या दोन्ही कार्यक्रमाला अजित पवारांनी सुरुवात केली आहे. त्यांनी पिंपरी चिंचवडमध्येही अशाच पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.
पुढील टप्प्यामध्ये पुणे जिल्ह्यात अशाच पद्धतीचे कार्यक्रम अजित पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून आयोजित करणार येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अजित पवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतः ग्राउंडवर उतरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची पार्श्वभूमी तयार करत आहेत. एकीकडे भाजपाकडून आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी जोर लावला असताना दुसरीकडे अजितदादा स्वतः मैदानात उतरल्याने आता हा सामना अधिक रंजक होणार, असं बोललं जात आहे.
प्र: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किती कालावधीत होणार आहेत?
उ: सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्र: पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणता भाग बालेकिल्ला मानला जातो?
उ: पुणे जिल्हा व विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे.
प्र: अजित पवार कोणते प्रमुख कार्यक्रम राबवत आहेत?
उ: ‘जनसंवाद’ आणि ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ हे दोन प्रमुख कार्यक्रम राबवले जात आहेत.
प्र: या कार्यक्रमांचा उद्देश काय आहे?
उ: थेट नागरिक व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून संघटना मजबूत करणे आणि निवडणुकीसाठी तयारी करणे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.