पुणे : पुणे शहराचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी, त्याचप्रमाणे रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, मुसळधार पावसामुळे नाल्यांचा निर्माण होणारा प्रश्न इत्यादीसाठी महापालिकेच्या वतीने राज्य सरकारकडे प्रस्ताव आहेत. यासाठी दोन हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजूरी देण्याचा निर्णय मी आणि मुख्यमंत्री मिळून घेतला आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हंटले आहे.
यातील जवळपास ६० टक्क्यांचा निधी राज्य सरकारकडून पालिकेला देण्यात येणार आहे. यापूर्वी आपण सरकारात असताना पुण्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले. आता पुन्हा एकदा सरकारात आल्यावर पुण्याच्या विकासाला गती देणार आहे, असेही फडणवीस यांनी म्हंटले आहे.
पुणे पालिकेमार्फत पुणे -मुंबई जुने महामार्ग रुंदीकरण, बावधन भागाला समान पाणी पुरवठ्याची योजना, अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे इमारत या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे भूमीपूजन फडणवीसांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय काका पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गणेश बिडकर, धीरज घाटे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘जेव्हा पुणे महापालिकेत आणि राज्यातही आपण सत्तेत होतो, तेव्हा वर्षानुवर्षे रखडून पडलेले प्रकल्प आपण मार्गी लावले. मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. मेट्रोच्या पुढील प्रस्तावांना त्वरीत मंजूरी देण्यात येईल व लवकरच पुण्यात मेट्रोचे जाळे पसरवण्यात येईल. पुण्यातल्या नद्यांचे सुशोभीकरण आणि नदी शुद्धीकरण प्रकल्पही दृष्टीपथात आहेत. नदीमध्ये सांडपाणी असेच सोडत राहिलो तर त्याचे पावित्र्य राखले जाणार नाहीत. पुण्याला समान पाणी पुरवठा योजना याचे कार्य वेगाने करण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांची पूर्ती झाली तर पाण्याचा प्रश्न निकाली लागेल, असे फडणवीस म्हणाले.
पुण्यातल्या नाल्यांना पावसाळ्यातील पुरामुळे मोठे नुकसान पोहचत आहे. असे पूर थांबवण्यासाठी एकूण २८ नाल्यांभोवती भिंत उभी करण्यासाठी ७०० कोटी, कात्रज - कोंढवा रस्ता जमीनीच्या संपादनासाठी २६० कोटी, यासोबतच विविध ठिकाणची उड्डाणपूल, भुयारी मार्ग समतल विगलक यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकार करणार आहे. हे पैसे पुढील तीन वर्षांमध्ये उपलब्ध होतील. यामध्ये ६० टक्के रक्कम राज्य सरकारची तर ४० टक्के रक्कमेची तरतूद महापालिका करावी लागेल. शहराच्या विकासासाठी नधी कमी पडू दिली जाणार नाही. आता महापालिका प्रशासनाने सर्व मान्यता वेगाने पूर्ण कराव्यात, अशी सूचना फडणवीस यांनी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षात भाजपने पुणे शहराचा पूर्ण कायापालट केला. वैद्यकीय महाविद्यालय, नदी काठ सुधार, वैद्यकीय महाविद्याल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. आता पुन्हा सत्ता आल्याने प्रकल्प कागदावर न राहता ते पूर्ण होतील.
रिंग रोडमुळे अडीच लाख कोटींची गुंतवणूक :
पुण्याचा आउटर रिंग रोड हा वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याच्या भूसंपादनासाठीच १० ते १५ हजार कोटी रुपयांपर्यंत रक्कम लागणार आहे. हा रिंग रोड पुण्याचा इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून समोर येईल, त्यातून पुढील काळात अडीच लाख रुपयांची गुंतवणूक होईल. बंगलोर प्रमाणे पुण्यात गुंतवणुकीची इको सिस्टीम तयार होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.