Dnyaneshwar Katke Protest Sarkarnama
पुणे

Pune News : प्रशासनापुढे सत्ताधारी आमदाराने हात टेकले : थेट उपोषणावर बसण्याची नामुष्की; सुनेत्रा पवारांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

Dnyaneshwar Katke, Wagholi Road, PMRDA: वाघोली-आव्हाळवाडी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आमदार ज्ञानेश्वर कटके उपोषणाला बसले आहेत. PMRDA आणि प्रशासनावर दुर्लक्ष व टोलवाटोलवीचे आरोप करत त्यांनी जनआक्रोश आंदोलनाचा इशारा दिला.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्याजवळील वाघोली ते आव्हाळवाडी या अवघ्या ५०० मीटर रस्ता दुरवस्थेचा प्रश्न आता कमालीचा तापला आहे. तब्बल दोन वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने, अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना देखील रस्त्यावर बसण्याची नामुष्की ओढावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. मात्र सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रस्त्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

​'अधिकारी एसीत, जनता खड्ड्यात!'

​वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यावरील खड्डे आणि धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आज सकाळपासून आमदार कटके यांनी याच रस्त्यावर ठाण मांडत उपोषण सुरू केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.

याबाबत बोलताना आमदार माऊली कटके म्हणाले, "गेल्या दीड वर्षापासून आम्ही या रस्त्याच्या कामासाठी सतत पाठपुरावा करत आहोत. अखेर आज आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या शांततेच्या आणि आंदोलनाच्या मार्गाने येथे उपोषणाला बसावे लागले आहे. अगदी दुपारपर्यंत या संदर्भात प्रशासनाकडून किंवा पीएमआरडीएकडून आमच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही किंवा कोणतीही चर्चा झाली नाही.

अधिकारी सध्या आपापल्याच नादात असून, आंदोलन आपोआप संपून जाईल अशा अविर्भावात दिसले. परंतु ही केवळ सुरुवात आहे. भविष्यात सर्वसामान्य माणसाच्या भावनांचा विचार करून आणि त्यांच्या वेदना ओळखून जर ही विकासकामे झाली नाहीत, तर या परिसरात सर्वसामान्यांना सोबत घेऊन आणखी मोठे जनआक्रोश आंदोलन उभे केले जाईल." असा इशारा माऊली कटके यांनी दिला.

कटके पुढे म्हणाले की, शिरूर आणि हवेली तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. तिथे चालणेही कठीण झाले असून, खड्डे बुजवणे आणि रस्ते दुरुस्ती करणे हे विषय प्रशासनाने फार लांबणीवर टाकले आहेत. हा संपूर्ण परिसर 'अर्बन एरिया' असून येथे अनेक गृहप्रकल्प, शाळा, गृहनिर्माण सोसायट्या आणि वेअरहाउसेस आहेत. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत.

गेल्या २ वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या संदर्भात पाठपुरावा करत आहोत. ८-१० महिन्यांपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या उपस्थितीत PMRDA व इतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत या रस्त्याला निधी देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

मात्र PMRDA ला सूचना देऊनही त्यांनी अद्याप कोणतीही मदत किंवा ठोस कारवाई केलेली नाही. PMRDA कडून केवळ टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. PMRDA ने वाघोली, हवेली आणि शिरूर तालुक्यातून मंजुरी आणि पूर्तता प्रमाणपत्रांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. मात्र, त्या बदल्यात या भागात नेमकी किती विकासकामे केली, हा मोठा प्रश्न आहे.

आज पीएमआरडीएचे अधिकारी आणि बिल्डर्स यांच्यात चांगलाच लागेबांधे पाहायला मिळत आहेत. जिथे त्यांचे प्रकल्प सुरू आहेत, तिथे तात्पुरती कामे केली जातात. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा संशय आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निधी देण्यास प्रशासनाकडे वेळ नाही. या भागातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली असून लाखो लोकांना रोज या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असा आरोप त्यांंनी केला.

कटके यांनी उपोषण सुरू केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम व पीएमआरडीएचे अधिकारी उपोषणस्थळी आले. त्यांनी कटके यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. दुरुस्ती करून देऊ असे आश्वासन दिले. मात्र कटके यांनी काँक्रीटीकरण रस्त्याची मागणी करून उपोषण सुरू ठेवले. सायंकाळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT