अजित पवार सरकारनामा
पुणे

असले फाल्तू प्रश्न मला विचारू नका!.. अजित पवार का वैतागले?

जरंडेश्वर सहकारी (Jarandeshwar) साखर कारखानाप्रश्नी होणाऱ्या आरोपांना अजित पवार (Ajit Pawar) यांचे उत्तर

सरकारनामा ब्यूरो : रविवार, 10 जानेवारी 2021

पुणे : जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सातत्याने होणाऱ्या आरोपांना कंटाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सविस्तपणे पत्रकार परिषद घेतली. राज्यात मी एकट्यानेच साखर कारखाना विकत घेतलेला नाहीतर अशा 64 सहकारी साखर कारखान्यांचा लिलाव झाला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे झाली आहे. त्यामुळे यात बेईमानी काहीच झालेली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. काही प्रश्नांवर मात्र ते वैतागलेले दिसले.

अजित पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर प्राप्तिकर खात्याने नुकतीच छापे मारून कारवाई केली. त्याबद्दल विचारले असता त्यांनी या संस्थांनी जरूर ती चौकशी करावी. यातून खरे तेच बाहेर येईल. `तुम्ही पहाटे भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले आणि त्यानंतर भाजपची साथ सोडली. त्यामुळे तुमच्यावर छापे पडत आहेत का, या प्रश्नावर त्यांनी त्रागा व्यक्त करत असले फाल्तू प्रश्न विचारू नका, असे सांगितले. मी कोणाबरोबर जायचे किंवा नाही, हा माझा निर्णय आहे. हा निर्णय घ्यायचा अधिकार मला आहे. हे तरी तुम्हाला मान्य आहे का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

तुम्ही पत्रकार मंडळी हा काय म्हणतो त्यावर मला विचारता आणि मी काय म्हणतो त्यावर दुसऱ्याला विचारता. तुम्हाला दुसरे काय काम आहे, असे म्हणत इतर कारखान्यांच्या विक्रीबाबत तुम्ही कधी इतरांना प्रश्न केले का, अशा प्रतिसवाल केला. मी ही माहिती मुंबईतील पत्रकारांना देऊ शकत होतो. पण पुण्यातील पत्रकारांना द्यावी म्हणून येथे माहिती देतोय, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे नाव न घेता त्यांनी काही लोकांना उद्योग नसल्याने ते चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यासाठीत्यांनी सीए आणि वकिल नेमले आहेत. त्यांचा इकडून आणि तिकडून दौरा सुरू आहे. प्रत्यक्षात त्यांना हाती काही लागत नाही. ते पुणे जिल्हा बॅंकेत गेले. ती बॅंक तर व्यवस्थित सुरू आहे. पारनेर कारखान्यावर ते जाऊन आले. त्याचे पुढे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. आणखी दहा कारखान्यांचे टेंडर निघाले. ते भरा. ते भरायला कोणी मनाई केली आहे का? कारखाने चालवणे हे काही येरागबाळ्याचे का नाही, असेही त्यांनी आवर्जून केले. सोमय्या यांच्याविरोधात न्यायालयात जाऊन कारवाई करणार का, या प्रश्नावर त्यांनी मला तेवढाच उद्योग नाही. माझा तसा स्वभाव नाही. आपण भले आणि आपले काम भले, अशी माझी वृत्ती आहे. शहाण्याने न्यायालयाची कोर्टाची पायरी चढू नये, असे आपल्याला लहानपणी शिकवले जाते, याचीही आठवण त्यांनी करून दिली.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना नीट चालत नव्हता. तसेच मुंबै बॅंकेने या कारखान्याला कर्ज दिलेले होते. त्याविरोधात मुंबईतील एक सोसायटी उच्च न्यायालयात गेली होती. या बॅंकेचे पैसे कारखान्याने वेळेत द्यावेत, असे उच्च न्यायालयाने सांगितले होते. कारखाना त्यावर सर्वोच्च न्यायालयात गेला होता. तरीही कारखान्याला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे राज्य बॅंकेने तो कारखाना विकला, अशी माहिती पवार यांनी या वेळी सांगितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT