पुणे : गणेशोत्सवात अफजलखानाचा (Afzal khan) वध या विषयावरील जिवंत देखावा दाखविण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परवानगी नाकारल्याचे पुणे पोलिसांनी (Pune Police) स्पष्ट केले आहे.
मुंबईमध्ये दहिहंडीच्या उत्सवात गोविंदांनी अफझल खानाचा वध हा देखावा सादर केला होता. मात्र, पुण्यात या देखाव्याला परवानगी नाकारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोथरुड गावठाण येथील संगम तरुण मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सवसमंडळ यंदा ५६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
संबंधित मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना व प्रसंगावर आधारीत देखावा सादर केला जातो. यावेळी मंडळाने गणेशोत्सवासाठी अफजलखानाचा वध या विषयावरील जिवंत देखावा सादर करण्यात येणार असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी कोथरूड पोलिसांकडे केली आहे. त्यावर पोलिसांनी वरील उत्तर दिले आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारलेली असली तरीही मंडळाकडून मात्र देखावा सादर करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे म्हणाले, ‘‘आम्ही मागील 20 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील घटना व प्रसंगावर आधारीत देखावे सादर केले आहेत. यावर्षी आम्ही अफजलखानाचा वध हा देखावा सादर करणार आहोत. त्याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही आम्ही देखावा सादर करणार आहोत.''
या प्रकरणी मंडळाकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली जाणार आहे. मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी सोमवारी मुंबईला जाणार असून ते मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे हा प्रश्न मांडणार आहेत. त्यामुळे दोघेही नेमकी काय भूमिका घेतील, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मंडळाने आमच्याकडे परवानगी मागितली होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित देखावा सादर करु नये, असे मंडळाला आम्ही कळविले आहे, असे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.