Sharad Pawar, Eknath Shinde sarkarnama
पुणे

Pune News : अखेर प्रशासनाने चूक सुधारली; पवारांना दिले निमंत्रण!

Baramati Melava बारामती येथे दोन मार्चला राज्य सरकारच्या वतीने नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Chaitanya Machale

Pune News : राज्य सरकारच्या वतीने बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या ' नमो महारोजगार मेळाव्यासाठी ' आता ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने आपली चूक सुधारत या मेळाव्याची सुधारित निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये शरद पवार यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

बारामती येथे दोन मार्चला राज्य सरकारच्या वतीने नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांची निमंत्रण पत्रिका जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली होती.

त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यांची नावे टाकण्यात आली होती. मात्र, ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाचा कोणताही उल्लेख निमंत्रण पत्रिकेत करण्यात आला नव्हता, तसेच त्यांना निमंत्रणदेखील देण्यात आले नव्हते. यावरून जोरदार वाद सुरू झाला होता. राज्य सरकारच्या या कारभारावर सर्वच स्तरातून जोरदार टीकादेखील केली जात होती.

जिल्हा प्रशासनाने आपली चूक सुधारत या मेळाव्याची सुधारित निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये शरद पवार यांच्या नावाचा समावेश करण्यात आला असून, त्यांना निमंत्रणदेखील देण्यात आलेले आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. दोन आणि तीन मार्च अशा दोन दिवशी हा कार्यक्रम चालणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी बारामती येथे करण्यात आली आहे.

बारामती येथे होत असलेल्या या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले नसल्याचे समोर आले होते. खासदार सुप्रिया सुळे आणि अ‍ॅड. वंदना चव्हाण यांना निमंत्रण दिले असताना पवार यांचे नाव नसल्याने वाद सुरू झाला होता. दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यक्रमांसाठी नाव निमंत्रण पत्रिकेत छापण्यात येऊ नये, असे स्वत: पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजशिष्टाचार विभागाला यापूर्वीच कळविले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dycollector Change In Invitation letter

त्यामुळे त्यांचे नाव टाकण्यात आले नव्हते. मात्र, सुधारित निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आता जिल्हा प्रशासनाने आपली चूक सुधारून नव्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवार यांच्या नावाचा समावेश केला आहे. शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य असा उल्लेख त्यांच्या नावाखाली करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार हे आवर्जून उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT