Pune News : कोंढवा येवलेवाडी येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ शनिवारी दुपारी साडेतीन वाजता अज्ञात हल्लेखोरांनी रिक्षाचालक गणेश काळे (वय ३८) यांच्यावर गोळ्या झाडल्या. तीन गोळ्या लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात दहशत पसरली.आता या घटनेचं हादरवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसातील (Pune Police) वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे विशेष पथके तयार करण्यात आली. कोंढवा डीबी पथकाने एपीआय अफरोज पठाण, सूरज शुक्ला, विशाल मेमाणे, अभिजीत जाधव यांच्या नेतृत्वात तपास हाती घेतला.
अवघ्या चार तासांत खेड शिवापूर परिसरातून चार आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात यश आले. अटकेतील दोन अल्पवयीन आरोपी आहेत, तर इतर दोघे अमान मेहबूब शेख (२२, रा. येवलेवाडी) आणि अरबाज अहमद पटेल (२४, रा. कोंढवा) असे आहेत. आरोपींकडून दोन देशी पिस्तुलं, जिवंत काडतुसे आणि दोन कोयते जप्त करण्यात आले.
गणेश काळे हा गायकवाड टोळीतील कुख्यात गुंड समिर काळे याचा धाकटा भाऊ आहे. समीर काळे हा टोळीतील नंबरकरी आहे. वर्षापूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर(Vanraj Aandekar) यांच्या हत्या प्रकरणांमध्ये समीर काळे हा मुख्य आरोपीपैकी एक असून सध्या पोलिसांनी त्याला अटक केली असून तो जेलमध्ये आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणांमध्ये समीर काळे याने बंदूक पुरवली असल्याचा देखील पोलीस तपासात उघड झाला आहे.
या पार्श्वभूमीवर गणेश च्या हत्येला टोळीयुद्धाची किनार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आंदेकर यांच्या हत्येनंतर प्रतिस्पर्धी टोळी यांच्यातील वैर वाढले असल्याचे सांगितले जाते.घटनेच्या वेळी खडी मशीन चौकात नागरिकांची ये-जा सुरू होती. अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने लोक पळापळ करू लागले.
गुन्हेगाराने गोळ्या झाडल्यानंतर कोयत्याने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. कोंढवा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह शवचिकित्सेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांत अशा घटनांमध्ये वाढ झाली असून, ही घटना पुन्हा एकदा शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.