Sambhajiraje
Sambhajiraje Sarkarnama
पुणे

Sambhajiraje : राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार जबाबदार राहील; संभाजीराजेंचा इशारा

Sudesh Mitkar

Pune, 13 June : राज्यात खरीप हंगाम सुरू होत असून खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना अवाच्या सव्वा दरामध्ये खतखरेदी करावी लागत आहे. राज्यात खतविक्रीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे, असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी केला. याबाबत सरकारने तातडीने पावलं न उचलल्यास स्वराज्य पक्ष हा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. त्यामुळे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशारा संभाजी राजे छत्रपती यांनी दिला.

राज्यात खताचे सुरू असलेल्या रॅकेटचा खुलासा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या वेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, स्वराज्य पक्षाच्या (Swaraj Party) वतीने शेतकरी (Farmer) हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागांमधील अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडे शेतीसाठी लागणारी खते, बी बियाणे, युरिया यांची वाढीव दराने विक्री केली जात असल्याच्या असंख्य तक्रारी केल्या आहेत.

काही ठिकाणी खतांचा तुटवडा निर्माण करून कृत्रिम टंचाईही केली जात आहे, अशी माहितीही आम्हाला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुणे शहरात मार्केट यार्ड परिसरातील खत विक्री दुकानांमध्ये जाऊन युरिया खरेदी केला. ₹ २६६ रुपयांना मिळणारी गोणी तब्बल ८०० रुपयांना विकत असल्याची धक्कादायक बाब या घटनेतून आमच्या लक्षात आली. या बाबत आमच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेबाबतचे व्हिडिओ चित्रिकरण केले आहे. खत खरेदीचे बिलही मिळाले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, ही घटना अतिशय धक्कादायक आहे. MRP पेक्षा खताची जवळपास तिप्पट दराने विक्री होत असल्याची घटना अतिशय गंभीर आहे. मागील महिन्यातच स्वराज्य पक्षाच्या वतीने राज्याच्या कृषी आयुक्तांना अधिकच्या दराने होत असलेल्या विक्री तसेच बोगस खते व बियाणे या बाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या बाबत निवेदन सादर केले होते. काही कारणास्तव या नंतर दोन दिवसांतच कृषी आयुक्तांची बदली झाली. सद्यस्थितीत राज्याला कृषी आयुक्त नाही, हे अतिशय धक्कादायक आहे.

राज्यात अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची लूट, फसवणूक सुरू आहे. या बाबत राज्य सरकारने तातडीने कार्यवाही केली पाहिजे. शेतकऱ्यांची लूट होत असताना राज्यकर्त्यांचे मात्र त्याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक व्हॉट्स ॲप नंबर प्रकशित केला आहे. परंतु या व्हॉट्स ॲप नंबरवर आपल्या तक्रारींना न्याय मिळण्याची शक्यता वाटत नसल्यामुळे नागरिक आमच्याकडे जास्त तक्रारी करत आहेत, असा दावाही संभाजीराजेंनी केला.

राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट सुरू असताना कृषी मंत्री ग्राउंडवर येऊन काम करणे अपेक्षित असताना, हे कृषी मंत्री whats app नंबर, फेसबुक द्वारे जाहीर करून online तक्रारी मागवत आहेत. कृषिमंत्र्यांकडून हे अपेक्षित नाही. कृषी मंत्र्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करणे आवश्यक आहे. राज्यभरात शेतकऱ्यांना अशाप्रकारे लुटले जात असताना कृषी खाते झोपा काढत आहे का? असा सवालही त्यांनी केला.

स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते या गोष्टींवर राज्यभरात लक्ष ठेवणार आहेत. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हायला हवी. मागच्या वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना विमा अग्रीम आणि विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. कृषी मंत्र्यांनी आत्ता रस्त्यावर यायला हवं. सर्वात जास्त फसवणूक मराठवाड्यात आणि विदर्भात झाली आहे. हे मोठं रॅकेट असून यात डीलर आणि अधिकारी एकत्र येत शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. सरकारने जर आत्ता कारवाई केली नाही, तर स्वराज्य रस्त्यावर उतरणार आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT