Indapur Assembly Election Sarkarnama
पुणे

Indapur Politics : इंदापूरची वाटचाल तिरंगी लढतीकडे; पाटील, भरणेंनंतर शरद पवार गटाचाही शड्डू

Vijaykumar Dudhale

Pune, 05 July : विधानसभा निवडणुकीला आणखी तीन महिन्यांचा अवधी असतानाच इंदापूर तालुक्याचे राजकारण मात्र तापू लागले आहे. पूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रेय भरणे दोन गटात असणारी लढत आता तिरंगी होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भर पडली आहे. पाटील, भरणे यांच्यानंतर शरद पवार गटानेही विधानसभेसाठी इंदापुरात शड्डू ठोकला आहे. ‘आजपर्यंतचा इतिहास साहेब म्हणतील, तोच इंदापूर विधानसभेचा आमदार,’ असे सांगत त्यांनी भरणे-पाटील यांना खुले चॅलेंज दिले आहे.

आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे सध्या महायुतीमध्ये एकत्र आहेत. विद्यमान आमदार असल्याने इंदापूरची (Indapur) जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सोडावी लागणार आहे, त्यामुळे इंदापूरमध्ये विधानसभेला महायुतीमध्ये बिघाडी अटळ आहे. त्यात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी जो विधानसभेला आमचे काम करेल, त्यालाच लोकसभेला मदत, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे इंदापूरमध्ये भरणे, पाटील हे समोरासमोर येणार, हे निश्चित आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडून दोनच दिवसांपूर्वी इंदापुरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'आमचा स्वाभिमान, आमचे विमान, आमचं आता ठरलयं, लागा तयारीला विधानसभा 2024' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यातून हर्षवर्धन पाटील हे पुन्हा अपक्ष विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दुसरीकडे, आमदार भरणे यांच्या गटाकडूनही हर्षवर्धन पाटील गटाला उत्तर देत त्यांच्या बॅनरशेजारीच ‘आमचं ठरत नसतं, तर आमचं फिक्स असतं,’ अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे. विकासाची परंपरा कायम राखू या; चला विजयाची हॅट्‌ट्रीक पूर्ण करुया. मिशन 2024, असा मजकूरही त्यावर आहे. भरणे यांचे मोठे छायाचित्र आणि त्यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो आहे. हा बॅनर इंदापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आल्याचे त्यांच्या फोटोवरून स्पष्ट होते.

आता या दोन गटांत असणारी लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही आता विधानसभेसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून इंदापूर शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT