Dilip Mohite
Dilip Mohite Sarkarnama
पुणे

Dilip Mohite : ‘बचेंगे तो और लडेंगे’ म्हणत आमदार मोहितेंनी दिले विधानसभा लढविण्याचे संकेत

सरकारनामा ब्यूरो

राजगुरुनगर (जि. पुणे) : 'राजकारणात मी बिनधास्तपणे वावरलो. सतत लोकसेवेत व्यस्त राहून राजकारणात अनेक स्तरांवर काम केल्याने आता समाधानी आहे. तरी ‘बचेंगे तो और भी लडेंगे',' असे म्हणत खेडचे (Khed) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढविण्याचे संकेत दिले. (Hints of NCP MLA Dilip Mohite to contest upcoming assembly elections)

हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनामिमित्त महाविद्यालयाच्या आवारात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी अनावरण करण्यात आले. त्या कार्यक्रमात आमदार मोहिते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारे अभिनेते अनिल गवस, संस्थेचे उपाध्यक्ष बबनराव डांगले, सरचिटणीस प्राचार्य शिवाजीराव मोहिते, खजिनदार सुरेखा मोहिते उपस्थित होते.

आमदार मोहिते म्हणाले की 'अनेक पदे भूषवित सरपंच ते आमदार असा प्रवास केला. अनेक संस्थांवर काम केले. स्वतःची शिक्षणसंस्था उभारली. परिणामांची चिंता न करता जनतेच्या हितासाठी राजकारण केले. झालेली कामे पाहताना समाधान वाटते. राजकीय आणि सामाजिक जीवनात संघर्ष करावा लागला, पण अश्रू ढाळत बसलो नाही. पुन्हा उभा राहिलो. सत्कर्म केले की परमेश्वर आणि लोक मागे उभे राहतात, असा विश्वास आहे.'

नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयाचे संपूर्ण आकलन करून देणे, त्यांच्या क्षमतांचा विकास करणे, विषयनिवडीचे स्वातंत्र्य देणे, त्यांची संवेदनशीलता वाढविणे, नीतीमूल्ये जोपासणे इत्यादी नवीन धोरणाची उद्दीष्टे आहेत. महाविद्यालयांनी बहुशाखीय होणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे, असे धोरणात अपेक्षित आहे. शिक्षणसंस्था स्वायत्त करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे शिक्षणाची उपलब्धता कमी होऊनदुर्बल घटकातील मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी केंद्र व राज्य सरकारला घ्यावी लागेल. अध्यापकांनी मनोधारणा बदलली पाहिजे. कारण, आता विद्यार्थी लेक्चर ऐकायला नाही तर प्रश्न विचारायला वर्गात येणार आहेत. म्हणून स्वतः अभ्यासू होऊन विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान द्यावे लागणार आहे. त्याद्वारे शिक्षक समाज परिवर्तन करू शकतील, असे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, स्वत्व व बलस्थाने ओळखून करिअर करावे, असे गवस यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. किरण शिंदे यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. प्राचार्य मोहिते यांनी प्रास्ताविक केले. आदेश टोपे यांनी सूत्रसंचालन केले, तर डांगले यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT