Vasant More
Vasant More Sarkarnama
पुणे

Vasant More To Pawar : भोर-वेल्हे-मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा? तो ढासळायला वेळ लागणार नाही; वसंत मोरेंनी डागली तोफ

मनोज कुंभार

Pune News : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना भोर, वेल्हे आणि मुळशी या तीन तालुक्यांत मिळून केवळ १९ हजारांचे मताधिक्य मिळाले. मग भोर, वेल्हे, मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बारामती लोकसभा संघटक वसंत मोरे यांनी केला. (How is Bhor-Velhe-Mulshi Pawar's fortress? : Question by Vasant More)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची आढावा बैठक वेल्हे तालुक्यातील विंझर येथे झाली. या बैठकीत बोलताना मोरे यांनी राष्ट्रवादीला डिवचले आहे. आता राष्ट्रवादीकडून मोरे यांना कशा प्रकारे उत्तर दिले जाते, हे पाहावे लागणार आहे.

ते म्हणाले की, भोर मतदारसंघाचे आमदार काँग्रेसचे आहेत. या तीनही तालुक्यांतील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदा, नगरपालिका या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. असे असूनही या तीन तालुक्यांत खासदार सुप्रिया सुळे यांना १९ हजारांचे मताधिक्य आहे. पवारांच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून तो ढासळायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वेल्हे तालुका हा पुणे शहरापासून अवघ्या अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावर आहे. असे असूनही तालुक्याचा जसा विकास व्हायला पाहिजे होता, तेवढा विकास झालेला नाही. राजगड आणि तोरणा असे दोन ऐतिहासिक किल्ले, पर्यटनाला संधी असतानाही त्याबाबत प्रयत्न झालेले नाहीत, असा आरोपही वसंत मोरे यांनी केला.

ते म्हणाले की, चेलाडी ते वेल्हे हा ३० किलोमीटरचा रस्ता लोकप्रतिनिधींना नीट करता आलेला नाही. या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे. मढेघाट फोडणार असे निवडणुकीच्या वेळी दिले जाणारे आश्वासन खोटे असून, तालुक्यातील जनतेने आता या प्रस्थापित नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. मनसेच्या कार्यकर्त्यांनीही आतापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागावे.

वेल्हे तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा दोन नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षाची ताकदही मोठी आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम करून पक्षाची ताकद वाढविण्यात येईल, असे पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी सांगितले.

या वेळी जिल्हा सचिव सागर खंडाळे, पुणे शहर पर्यावरण विभागाचे अध्यक्ष नितीन जगताप, मनसेचे तालुकाध्यक्ष दिगंबर चोरघे, भोर तालुका अध्यक्ष दीपक पांगारे, अंकुश दसवडकर आदींसह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT