Daund News : दौंड बाजार समिती प्रथमच हातात आल्यानंतर झालेल्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार राहुल कुल यांनी मागील काळात बाजार समितीच्या चालणाऱ्या कामकाजाबाबत हल्लाबोल केला. ‘सेस गोळा करण्याच्या या पूर्वीच्या पद्धतीवर योग्यवेळी बोलेन. रडत बसण्यापेक्षा कायद्याच्या चौकटीत राहून पुढे जाऊ. झाकून चाललेले कामकाज यापुढे खुलेपणाने करूया,’ अशा शब्दांत त्यांनी माजी आमदार रमेश थोरात यांच्या काळात चालणाऱ्या कामकाजावर बोट ठेवले. (Rahul Kul put finger on the work of Daund Bazar Samiti during time of Ramesh Thorat)
एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप आमदार राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांची २५ वर्षांपासूनची सत्ता हिसकावून घेतली होती. त्यानंतर आज दौंड बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यात आमदार कुल बोलत होते.
ते म्हणाले की, राजकारण बाजूला ठेवून विरोधकांनी आम्हाला सूचना कराव्यात. देशात आणि राज्यात आपले सरकार आहे. तालुक्याचा आमदार म्हणून कायम सहकार्याची भूमिका घेतली जाईल. दौंड बाजार समितीत प्रथमच लोकशाही पद्धतीने कामकाज सुरू झाल्याचा आनंद आहे.
बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे म्हणाले की, आगामी काळात दौंड बाजार समितीमध्ये हमीभाव केंद्र सुरू करण्यात येईल. तसेच, शेतीमाल तारण योजना सुरू करण्यासाठी गोदामाची आणि धान्य चाळण यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
मागील काळात गुळावरील सेस गोळा करताना कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मागील लोकांनी फक्त सहली काढण्याचे काम केले आहे, असा आरोप मानसिंग शितोळे यांनी केला, तर बाजार समितीची गेल्या १९ वर्षांत प्रथमच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आहे. अशा सभा घेत असल्याबद्दल संचालक मंडळांचे अभिनंदन करतो, असे साहेबराव वाबळे यांनी स्पष्ट केले.
बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, संचालक अतुल ताकवणे, सचिव मोहन काटे यांनी सभासदांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. या वेळी आमदार राहुल कुल, उपसभापती शरद कोळपे, नामदेव बारवकर, तानाजी दिवेकर, हरिश्चंद्र ठोंबरे, नीळकंठ शितोळे, पोपटराव ताकवणे, अरूण भागवत, संजय दिवेकर आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.