Pune, 26 July : पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आमदार शरद सोनवणे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणे चांगलेच अंगलट आले आहे. आमदार सोनवणे यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी तक्रार ॲड विजय भिका कुऱ्हाडे यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्याकडे केला आहे. त्यावरून नार्वेकरांनी सोनवणेंना नोटीस दिली आहे, त्यामुळे आमदार सोनवणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शरद सोनवणे (Sharad Sonawane) यांनी २०२४ च्या निवडणुकीत जुन्नर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. जनतेने त्यांना अपक्ष म्हणूनच मतदान केलेले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २८ फेब्रुवारी २०२५ रोजी नारायणगाव येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार सोनवणे यांनी ‘आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे,’ असे जाहीर केले होते.
सोनवणे यांच्या शिवसेना (Shivsena) प्रवेशामुळे पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे, सध्या ते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत, त्यामुळे शरद सोनवणे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी ॲड विजय कुऱ्हाडे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एका अर्जाद्वारे केली आहे.
ॲड नार्वेकर यांनी आमदार शरद सोनवणे यांना पक्षांतर बंदी कायद्याची नोटीस पाठवली आहे. त्यात नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून आठ दिवसांत त्यावर आपण लेखी खुलासा करावा, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी नोटिशीद्वारे आमदार सोनवणे यांना दिले आहेत. त्यामुळे जुन्नरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत जुन्नर मतदासंघात तिरंगी लढत झाली होती. त्यात शरद सोनवणे, अतुल बेनके आणि सत्यशील शेरकर यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, तिरंगी लढतीत शरद सोनवणे यांनी दोन्ही राष्ट्रवादीचे बेनके आणि शेरकर यांचा पराभव करून विजय मिळविला होता.
‘मला नोटीस आलीय; पण पाच वर्षे काहीच होणार नाही’
याबाबत आमदार शरद सोनवणे म्हणाले, मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या व्यासपीठावर त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला मी जाऊ शकतो. त्यांचा मी सहयोगी सदस्य आहे. राज्यातील महायुती सरकारला मी पाठिंबा दिलेला आहे. मी अपक्ष होतो, आहे आणि राहणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडून मला पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे नोटीस आले आहे. ते मी खिशात ठेवले आहे. पाच वर्षे त्यावर काहीच होणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.