Pune : लोकसभा निवडणुकीच्या आधी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक ही सगळ्यांचेच लक्ष वेधून घेणारी होती. भाजपचा जवळ जवळ 28 वर्ष बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात झालेल्या या उत्कंठावर्धक निवडणूकीत भाजला चांगलाच हादरा बसला होता.
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.
पण कसबा मतदारसंघात झालेली 2023 ची ही पोटनिवडणूक भाजप आणि काँग्रेससाठी लिटमस टेस्ट ठरली होती. त्यामुळे कसबा पेठ मतदारसंघात आता होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचेचं लक्ष लागले आहे. पोटनिवडणुकीत ज्या दोन उमेदवारांमध्ये लढत झाली होती तेच दोन उमेदवार यंदा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे हे नक्की.
काँगेसचे रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपचे हेमंत रासने असा सामना कसबा विधानसभेत रंगणार आहे. त्यामुळे सध्या कसबा विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चुरस पाहायला मिळेल.
यावेळी मात्र काँग्रेससोबत बंडखोरी केलेल्या पुण्याच्या माजी महापौर कमल व्यवहारे अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यासोबतच मनसेचे गणेश भोकरे हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलेली आहे. या समीकरणामुळे निवडणुकीत कुणाला फटका बसतो आणि कुणाची ताकद वाढते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..!
कसबा विधानसभा मतदारसंघात पुण्यातल्या मध्यवर्ती समजला जाणारा प्रमुख सदाशिव पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ तसेच टिळक रस्ता, घोरपडे पेठ, बुधवार पेठ, सोमवार पेठ, हा भाग देखील कसबा विधानसभा मतदारसंघात येतो.
या मतदारसंघामध्ये उच्च मध्यमवर्गीय वर्ग आणि इतर काही भागात पुण्यातील कष्टकरी अठरापगड जातींच्या मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे कसब्यात कोणत्याही एका वर्गाचा विचार करून चालत नाही, त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कसब्यातील दोन्ही वर्गामध्ये विश्वास कोण निर्माण करतो मतदारसंघातील जनता कुणाला कौल देते? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खरं तर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मनला जायचा. 28 वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व राहिले. 1995 पासून2019 पर्यंत गिरीश बापट आणि 2019 मध्ये मुक्ता टिळक या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.
मात्र, 2023 मध्ये मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीत. काँग्रेसकडून माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे निश्चितच भाजपच्या साम्राज्याला हादरा बसला होता.
या निवडणुकीत महायुती(Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार आहेच. पण यावेळी मनसेचे उमेदवार गणेश भोकरे हे देखील यावेळी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.शिवसेना, मनसे अन् काँग्रेस असा प्रवास करणाऱ्या रवींद्र धंगेकरांना शिवसेना आणि मनसेचेही मत मिळत होती.
पण यावेळी भोकरेंची एन्ट्री निवडणुकीत झाल्याने धंगेकरांना ही मतं मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे याचा फायदा भाजपला नक्कीच होऊ शकतो. तरीदेखील मनसेची पारंपारिक मतं वगळता हिंदुत्ववादी मत भोकरे यांच्याकडे वळण्याची शक्यता कमीच आहे.
रविंद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar ) निवडणुकीत उतरवल्याने काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता होती. धंगेकरांचा राजकीय प्रवास हा पक्षांतराचा राहिलेला आहे. बाहेरून आले आणि थेट आमदार झाले अशी धंगेकरांबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती.
कमला व्यवहारे यांना 2019 ला तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. पण त्यावेळी त्या्ंना उमेदवारी मिळाली नाही. याशिवाय काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना देखील पोटनिवडणुकीत तिकीट मिळेल असं वाटत होतं. पण त्यांनादेखील डावलण्यात आले.
त्यामुळे यंदा 2024 च्या निवडणुकीत कमला व्यवहारे काँग्रेसच्या पक्षाचा राजीनामा देत निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. व्यवहारे यांच्याकडे पुण्यातील पारंपारिक मतदारांची व्होट बँक आहे. त्याचा फटका हा थेट धंगेकरांना होऊ शकतो आणि फायदा म्हणलं तर भाजपाला होऊ शकतो.
त्यामुळे यंदा कसब्याच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेची झालेली एन्ट्री आणि कमला व्यवहारे यांची बंडखोरी यामुळे, भाजपाने लोकसभा निवडणुका नंतर कसबा विधानसभा मतदारसंघात केलेले डॅमेज कंट्रोल आणि बंडखोरीमुळे झालेला मत विभाजनाचा धोका कुणाच्या पथ्थ्यावर पडणार याचे उत्तर 23 नोव्हेंबरला मिळणार आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.