Sharad Butte-Patil, Dilip Mohite Patil Sarkarnama
पुणे

Khed APMC Election : खेड बाजार समिती : मोहितेंविरुद्ध दोन्ही शिवसेनेसह भाजपची आगळी युती

उत्तम कुटे

Khed APMC Election : खेड कृषी उत्पन्न बाजार समतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांचा ताबा आहे. या निवडणुकीत आमदार मोहित यांच्या ताब्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर कब्जा करण्यासाठी विरोधकांनी आगळा-वेगळा प्रयोग केला आहे. या निवडणुकीसाठी चक्क भाजप आणि ठाकरे गट हे हाडवैरी एकत्र आले आहेत. त्यांना शिवसेनेचीही (शिंदे) साथ मिळाली आहे. येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे.त्यामुळे प्रचारासाठी अवघे सहा दिवसच मिळणार आहेत.

अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर गुरुवारी (ता. २०) खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. निवडणुकीतून १२५ उमेदवारांनी माघार घेतल्याने १८ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, खेड तालुक्यावर (Khed) आमदार मोहिते यांचे २००४ पासून कायम वर्चस्व राहिले आहे. मोहितेंविरुद्ध त्यांचे सगळे विरोधक एकत्र येऊनही ते विधानसभेसह जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि जिल्हा बँकेची निवडणूक लढवित आहेत. मात्र, २०१४ चा विधानसभेचा अपवाद वगळता त्यांना त्यात यश आलेले नाही.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar), दिलीप वळसे-पाटील यांच्याप्रमाणे आमदार मोहिते हे बिनविरोध निवडून आले. त्यावेळी, मात्र हे आता एकवटलेले विरोधक का एकत्र आले नव्हते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आमदार मोहितेंच्या भीमाशंकर सहकारी पॅनेलमध्ये जुन्यांबरोबर नव्या उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे. गतवेळी त्यांच्या विरोधकांना बाजार समितीत चार जागा मिळाल्या होत्या.

यावेळी, मात्र परिवर्तन होणार असल्याचा दावा आमदार मोहितेंच्या विरोधकांनी केला आहे. परिवर्तनाची नांदी सुरु झाल्याचे त्यांच्याविरुद्धच्या ठाकरे गट, शिवसेना आणि भाजपच्या भीमाशंकर शेतकरी परिवर्तन पॅनेलचे आधारस्तंभ आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख आणि परिवर्तन पॅनेलचे एक उमेदवार भगवान पोखरकर यांनीही यावेळी बदल होईल, असा दावा केला आहे. तर, यापूर्वीही आपले सारे विरोधक झाडून एकत्र आले होते. त्याचा काहीही फायदा झाला नाही. यावेळी पुन्हा बाजार समितीत शंभर टक्के आमचीच सत्ता येणार असल्याचा दावा आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला.

आमदार मोहिते यांच्या विरोधातील सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व लक्ष्मण टोपे, भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील (Sharad Butte Patil), अतुल देशमुख, भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, शिवसेनेचे पोखरकर, ठाकरे शिवसेनेचे अशोक खांडेभराड,रामदास धनवटे, अमोल पवार, संजय घनवट तसेच विजय शिंदे नेतृत्व करत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT