Dr.Amol Kolhe, Eknath Shinde, Ajit Pawar, Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी ! शिरूर लोकसभेची जागा अजितदादांकडे; 'वर्षा'वरील बैठकीत शिक्कामोर्तब

Chaitanya Machale

Shirur Political News : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना येणाऱ्या निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत ही जागा अजित पवार आपल्याकडे घेणार हे जवळपास निश्चित झाले होते. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली. त्यामध्ये शिरूर लोकसभेची जागा महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार असल्याचे 'फिक्स' झाले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटप निश्चित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी महायुतीत सहभागी असलेल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची एक बैठक मंगळवारी रात्री उशिरा पार पडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काही आमदार, खासदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तर काही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे डॉ.कोल्हे हे शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार यांनी डॉ.कोल्हे हेच आमचे उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे. शिरूरमधून तीन टर्म प्रतिनिधित्व करणारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत त्यांच्याकडे गेलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून यासाठी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे.

शिरुरची जागा लढविणार असून विद्यमान खासदार डॉ.कोल्हे यांचा पराभव करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठींबा दिलेल्या आढळराव पाटील यांना गेल्या आठवड्यात पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आल्याची टीका केली जात होती.

म्हाडाचे अध्यक्षपद मिळाले असले तरी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे आढळराव पाटील यांनी जाहीर महायुतीतील ताण वाढला होता. परंतु वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत ही जागा राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT