amol kolhe sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : 'हा' विधानसभा मतदारसंघ शिरूरचा बालेकिल्ला, मजबुतीसाठी कोल्हेंची 'इंडिया' आघाडीला हाक

Sudesh Mitkar

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून बारामती ( Baramati ) आणि शिरूर ( Shirur ) मतदारसंघासाठी आपले उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, मतदारसंघनिहाय आघाडीचे मेळावे पार पडत आहेत. अशाच प्रकारचा मेळावा आज सोमवारी ( 11 मार्च ) हडपसर मतदारसंघामध्ये पार पडला. मेळाव्याला शिरूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांनी त्यांच्यासाठी हडपसर मतदारसंघ महत्त्वाचा का? याबाबत खुलासा केला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचा ( Shirur Lok Sabha Constituency ) विजयाचा मार्ग हा हडपसर मतदारसंघातूनच जातो, असं बोललं जातं. कारण शिरूरच्या एकूण मतदारांचा विचार करता हडपसर विधानसभा मतदारसंघांत येणाऱ्या मतदारांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे ज्याने हडपसर राखला त्याचा शिरूर जिंकण्याचा मार्ग सुकर होत असतो. याचमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांकडून शिरूर जिंकण्याची तयारी ही हडपसर मतदारसंघातूनच करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सर्वप्रथम हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार चेतन तुपे ( Chetan Tupe ) यांना आपलंसं करण्यात यश मिळवलं आहे. नंतर अजित पवार यांनी याच मतदारसंघातून अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांना थेट आव्हानदेखील दिलं होतं. अमोल कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारत शिरूर लोकसभा निवडणुकीची तयारी हडपसरमधूनच करत असल्याचे दिसून आलं आहे. गेले चार ते पाच दिवस अमोल कोल्हे हे हडपसर मतदारसंघामध्ये तळ ठोकून आहेत. हडपसरवासीयांसाठी गेले तीन दिवस 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे मोफत प्रयोग कोल्हेंकडून करण्यात येत आहेत.

त्यानंतर आज कोल्हेंनी ( Amol Kolhe ) हडपसरमधील 'इंडिया' आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचा मेळावा आयोजित केला होता. या वेळी कोल्हे म्हणाले, "महायुतीमध्ये रोज एका नेत्याला तुम्ही शिरूर लोकसभेची जागा लढणार का? असं विचारलं जात आहे. तिकडे उमेदवार ठरत नसताना महाविकास आघाडीमध्ये सगळं एक वाक्यतेने सुरू आहे."

"शिरूर मतदारसंघातील शेतकरी हे भाजपच्या धोरणांमुळे हवालदिल झालेले आहेत. असे असतानादेखील भाजपचे नेते आम्हाला शेतकऱ्यांच्या रोषाचा काही फरक पडत नाही, अशी वक्तव्यं करत आहेत. हडपसर लोकसभा मतदारसंघांत पाच लाख 85 हजार मतदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून हडपसर मतदारसंघ हा फार महत्त्वाचा आहे. या मतदानाच्या जोरावर आंबेगाव, जुन्नर, खेड येथील शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याचे राक्षसी मनसुबे आखण्यात येत आहेत. हडपसर मतदारसंघ हा शिरूरचा बालेकिल्ला असून, तो मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे," असं कोल्हेंनी सांगितलं.

"ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि ज्याचा गड मजबूत असेल, त्यालाच मुलुखगिरीसाठी बाहेर पडता येतं. त्यामुळे 'इंडिया' आघाडीची मुलुखगिरी करण्यासाठी तुम्ही हडपसर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पार पाडावी," असं आवाहन कोल्हेंनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना केलं आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT