लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) कधीही घोषित होण्याची शक्यता आहे. पण, अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आज, सोमवारी ( 11 मार्च ) दिल्लीला रवाना होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज रात्री होणार आहे. त्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं निश्चित करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटला तर भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सहा जागांवरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 48 पैकी 42 जागांबद्दल कोणतंही मतभेद नाहीत. पण, 6 जागांवरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात बरेच मतभेद आहेत. त्यात नाशिक, परभणी, सातारा, शिरूर, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे हे मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातात हे उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल.
बैठकीला कोण असणार उपस्थित?
जागावाटपासंदर्भातील बैठकीला गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ), भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, शुक्रवारी ( 8 मार्च ) रात्री गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात बैठक झाली. अडीच तास झालेल्या या बैठकीत अमित शाहांनी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार, प्रफुल पटेल यांच्याशी वेगवेगळी चर्चा केली. त्यापूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर असतानादेखील अमित शाहांनी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांशी चर्चा केली होती. पण, जागावाटपावर तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे शाहांच्या उपस्थितीत जागावाटपाचा तिढा सुटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला 3 ते 4 जागा मिळू शकतात, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप 32 जागांवर लढू शकते. त्यासह भाजप आणि शिंदे गटात काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.