Pune News : लोकसभेची ( Lok Sabha Election 2024 ) रणधुमाळी सुरू झाली असून, राजकीय पक्षांकडून काही जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात ( Baramati Lok Sabha Constituency ) विद्यमान खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) अशी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) निमित्ताने पवार कुटुंबात अंतर्गत वाद समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठ महिन्यापूंर्वी बाहेर पडून राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा पवार कुटुंबातील अनेक व्यक्तींना पटलेला नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार ( Shriniwas Pawar), पुतणे युगेंद्र पवार ( Yugendra Pawar ), दुसरे पुतणे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत खासदार सुप्रिया सुळे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार सुळे यांच्या प्रचारासाठी रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे दौऱ्यासाठी मतदारसंघात फिरून मतदारांशी सुसंवाद साधत आहेत. असे असताना काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ), युगेंद्र पवार यांना आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांकडे केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसचे अधीक्षक पंकज देशमुख यांना सुळे यांनी याबाबतचे पत्र दिले आहे.
सुळे यांनी पाठवलेल्या पत्रात काय म्हटले?
"लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पद्धतीने, शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु, काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असं घडणं शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची व गंभीर बाब आहे. सुसंस्कृत व विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही. यामुळे आपणाकडून आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरविण्यात यावी, ही विनंती आहे. आपण याबाबत विनाविलंब कार्यवाही कराल, असा विश्वास वाटतो," असं सुप्रिया सुळे पत्रात म्हणाल्या.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.