Amol Kolhe Lok Sabha winner Sarkarnama
पुणे

Dr Amol Kolhe Lok Sabha winner : होय, मी खासदार होऊन दाखवलंच! शिरूरमध्ये आढळरावांचा नाही तर अजितदादांचा पाडाव

Chaitanya Machale

Shirur Lok Sabha Constituency winners News : बारामती लोकसभा मतदारसंघापाठोपाठ केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बाजी मारली आहे. या मतदारसंघात अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक असतानाही त्याचा खंबीरपणे मुकाबला करत कोल्हे यांनी आपल्या विजयाची पुनरावृत्ती करत 'हम भी किसीसे डरते नही', हे दाखवून दिले आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राज्यात सर्वात जास्त चर्चा होती ती बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची. पाच वर्षापूर्वी 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेमध्ये देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणूक लढविली आणि ते पहिल्यांदा खासदार म्हणून दिल्लीला गेले. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन पक्ष तयार झाले. शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. कोल्हे यांनी अजित पवार यांच्याबरोबर न जाता पवारसाहेबांबरोबर जाणे त्यांनी पसंत केले.

खासदार कोल्हे यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका करत या लोकसभेच्या निवडणुकीत तु निवडणूनच कसा येतो, ते बघतो, असे जाहीर आव्हानच अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना दिले. कोल्हे यांच्या विरोधात घेतलेल्या प्रत्येक सभेत अजितदादांनी कडक शब्दात समाचार घेतला. काहीही होऊ दे निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणारच ! असे ते म्हणत राहिले. या मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली होती. शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. गेल्या निवडणुकीत कोल्हे यांनी आढळराव यांचाच पराभव केला होता.

ज्यांच्या विरोधात इतकी वर्षे लढा दिला, त्यांनाच अजित पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीमधील आमदारांमध्ये मोठी नाराजी होती. खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी तर जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखविली होती. याचा फटका निवडणुकीत बसू नये, याासाठी अजित पवारांनी यामध्ये विशेष लक्ष घालत आमदारांशी चर्चा देखील केली. त्यानंतर काही प्रमाणात ही नाराजी कमी झाल्याचे पहायला मिळाले. बारामती लोकसभेचे मतदान पूर्ण झाल्यानंतर तर अजितदादा शिरूरमध्ये ठाण मांडून बसले होते. अखेरच्या दोन दिवसांमध्ये तर आढळराव पाटलांसाठी अजितदादांनी चक्क 15 ते 20 सभा देखील घेतल्या होत्या.

प्रचाराच्या अखेरच्या सभेमध्ये डॉ. कोल्हे यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देत 'करारा जवाब मिलेगा…'असे वक्तव्य केले होते. निकालाच्या निमित्ताने कोल्हे यांनी आपला शब्द पूर्ण करून दाखविला असल्याचे बोलले जात आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही कोल्हे विरूद्ध आढळराव अशी नव्हती तर कोल्हे विरूद्ध अजितदादा अशी होती. या निवडणुकीत विजय मिळवून 'होय मी खासदार होऊन दाखवलंच', असे कोल्हे यांनी दाखवून दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT