Ajit Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : फडणवीसांना जमलं नाही ते अजितदादांनी दणक्यात करून दाखवलं!

Katraj Kondhwa Road Widening : कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 200 कोटी देण्याची घोषणा केली होती.

Chaitanya Machale

Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतुकीची होणारी कोंडी कमी करण्यासाठी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे. यासाठी 200 कोटी रुपयांची आवश्यकता असून, हा निधी राज्य सरकारकडून महापालिकेला मिळणार आहे. विशेष बाब म्हणून कात्रज कोंढवा रस्त्यासाठी 200 कोटी रुपये निधी देण्यात राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. फेब्रुवारी महिनाअखेरपर्यंत हा निधी पालिकेला मिळणार आहे. (Ajit Pawar News) Katraj Kondhwa Road Widening

कात्रज-कोंढवा रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होत असते. रस्ता लहान आणि ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने त्याचा मोठा फटका या रस्त्यावरील वाहनचालकांना बसतो. या रस्त्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातील नागरिकांच्या जमिनींचे भूसंपादन करून त्या ताब्यात घेणे आवश्यक आहे. त्यानंतर तेथे रस्ता तयार केला जाणार आहे. या भूसंपादनासाठी सुमारे 700 कोटींपेक्षा अधिक निधीची गरज पडणार असल्याने हे काम रखडले आहे.

या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आणि या भागात होत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, अशी मागणी या भागातील माजी आमदार योगेश टिळेकर हे आग्रही होते. या प्रश्नाचा त्यांनी वारंवार पाठपुरावादेखील केला होता. राज्यात शिंदे- फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर या भागात होत असलेली वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या रस्त्यासाठी 200 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा केल्यानंतर आठ ते नऊ महिने झाल्यानंतरदेखील हा निधी पालिकेला मिळाला नव्हता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही हा निधी उपलब्ध होत नसल्याने महापालिका प्रशासन तसेच शहरातील लोकप्रतिनिधी हतबल झाले होते. काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हडपसर विधानसभा (Hadapsar Assembly) मतदारसंघातील समस्या जाणून घेतल्या होत्या. याच काळात उपमुख्यमंत्री पवार यांनी कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाची पाहणी करत हा निधी तातडीने देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार मंत्रिमंडळाने 200 कोटी रुपयांचा हा निधी मंजूर केला आहे.

विशेष बाब म्हणून हा निधी मंजूर करण्यात आला असून, पुढील दहा दिवसांत हा निधी पालिकेला मिळणार आहे. राज्य सरकारकडून हा निधी मिळाल्यानंतर यामधून रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादन आणि डांबरीकरण तातडीने करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नऊ महिन्यांत जे जमले नाही ते दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवघ्या काही दिवसांतच करून दाखवल्याने याची जोरदार चर्चा आता हडपसर विधानसभा मतदारसंघात रंगली आहे.

रस्त्याची रुंदी कमी, खर्च होणार कमी

कात्रज-कोंढवा या रस्त्याच्या रुंदीकरणाला मान्यता देताना या रस्त्याची रुंदी 84 मीटर एवढी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, रस्त्याची रुंदी आता 50  मीटर एवढी करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यासाठी भूसंपादनही कमी करावे लागणार असून, त्यासाठी सर्वसाधारण 277 कोटींचा खर्च येणार आहे.

(Edited By - Rajanand More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT