Sanjay Jagtap Sarkarnama
पुणे

Purandhar MLA With Supriya Sule : अजितदादांनी निवडून आणलेले आमदार म्हणतात ‘आम्ही सुप्रियाताईंसोबत...’

सरकारनामा ब्यूरो

Purandhar News : ‘साहेब, पुरंदरची जनता यापूर्वीही आपल्याच पाठीशी होती आणि यापुढेही उभी राहील. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत आम्ही ‘तन मन धना’ने सर्व गोष्टींसाठी सक्षमपणे उभे राहू, हे मी श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराच्या मंदिरात सर्वांसमोर जाहीरपणे सांगतो. तुम्ही आम्हाला फक्त हाक द्या, त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासोबत येऊ,’ अशा शब्दांत पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांनी आपण खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. (MLA elected by Ajitdada say 'We are with Supriyatai Sule...')

पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट संचलित सवाई मंगल कार्यालयाचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात आमदार संजय जगताप बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद पाठीशी उभी करून संजय जगताप यांना निवडून आणले होते. तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा जाहीर कार्यक्रमात सांगून पराभव घडवून आणला होता. त्यामुळे जगताप यांच्या भूमिकेकडे लक्ष होते. ते पवारांसोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

जगताप म्हणाले की, वैचारिक महाराष्ट्र आज कुठे चालला आहे, हा आपल्या सर्वांसमोरचा प्रश्न आहे. गेल्या वर्षभरापासून एक संवेदनाहीन सरकार आम्ही बघतोय. शेतकरी कुठे आहे, काय अवस्थेत आहे, यांचं काही देणंघेणं सरकारला नाही. बेरोजगारीबाबतही बेफिकीरपणा, महिलांच्या सुरक्षेबाबतही गंभीर नाही. तुझं माझं यामध्येच हे सरकार गुंतलं आहे.

गावभेट दौऱ्यात मला एकानं विचारलं की, झाला आमदार, तर कुठल्या मुहूर्तावर झाला. चांगला मुहूर्त तरी बघायचा. अशी अवस्था सरकारची झाली आहे. शरद पवारांनी सर्वसामान्य, शेतकऱ्यांसाठी काम केलं. जिथं प्रश्न आहे, त्या ठिकाणी धावून जाऊन मदत केली आहे. पुरंदरची जनता यापूर्वी आपल्या पाठीशी होती आणि यापुढेही उभी राहील. कारण आमच्या सर्वांसमोर केवळ अंधार आणि अंधार आहे. उजेडाचा किंवा दिशा दर्शविणारा दीप म्हणूनच आम्ही साहेब तुमच्याकडे बघतो आहोत, असेही संजय जगताप यांनी नमूद केले.

आमदार जगताप म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुरंदरच्या विकासाला गती मिळाली होती. पण, सध्या पश्चिम महाराष्ट्रात पुरंदर तालुका एकमेव आहे की, प्रत्येक कामावर स्टे आहे. पीडब्ल्यूडी, नगरविकास, पर्यटन प्रत्येक भागाातील कामाला स्थगिती आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आम्ही संख्येने किती आहोत, यापेक्षा फार मोठं पाठबळ तुमच्या पाठीशी पुरंदरमधून असणार आहे. तुमच्याबरोबर रस्त्यावर लढण्यासाठी खंबीरपणे उभे आहोत.

सुप्रिया सुळे मोठ्या बहिणीसारख्या

सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आमचं चांगलं को-ऑर्डिनेशन आहे. त्या प्रत्येक कामात मोठ्या बहिणीसारख्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडाबाबत त्यांनी दोन अडीच तास तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT