NCP & BJP Supporters Sarkarnama
पुणे

भोसरी-जुन्नर पीएमपी सुरु झाली अन् आमदार लांडगे आणि बेनके समर्थकांत जुंपली..

मुद्यावरची ही लढाई गुद्यावर जाते की काय अशी शक्यता या बससेवेच्या उदघाटनावेळी जुन्नरमध्ये निर्माण झाली होती.

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील भोसरी ते जुन्नर अशी `पीएमपीएमएल`ची (PMPML) बससेवा शुक्रवारी (ता.११ फेब्रुवारी) सुरु झाली. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे उत्तर टोक हे पिंपरी-चिंचवडसह (Pimpri-Chinchwad) पुणे (PMC) शहरालाही जोडले गेले. मात्र, या बससेवेवरून भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) श्रेयाची लढाई आता रंगली आहे. आपल्याच आमदारांमुळे ही बससेवा सुरु झाल्याचा दावा भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) आणि जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांच्या समर्थकांनी केला आहे. दरम्यान, एसटीच्या संपकाळातच ही बस सुरु झाल्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील चाकरमान्यांसह इतर प्रवाशांना, मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, मुद्यावरची ही लढाई गुद्यावर जाते की काय अशी शक्यता या बससेवेच्या उदघाटनावेळी सकाळी जुन्नरमध्ये निर्माण झाली होती. कारण दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते व समर्थकांत यावेळी जोरदार घोषणाबाजी होऊन बाचाबाचीही झाली. पण, पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामुळे पुढील अनर्थ टळला. नमूद करण्याजोगी दोन्ही आमदारांच्या गैरहजेरीत हा प्रकार घडला. आमदार लांडगे हे गोवा विधानसभा निवडणूक प्रचारासाठी गोव्यात आहेत. त्यांच्या वतीने त्यांचे कामगार नेते बंधू सचिन लांडगे आणि त्यांचे कट्टर समर्थक, भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती तथा अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे आदी या बस लोकार्पण सोहळ्याला जुन्नरला गेले होते. तर, भाजपच्या वतीने ही बाजू स्थानिक जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके आणि आमदार बेनकेंचे बंधू अमित व इतरांनी सांभाळली.

दोन्ही पक्षांनी ही बससेवा सुरु करण्यासाठी पहिले पत्र दिले व पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. ती सुरु होताच आम्ही करून दाखवले, असे फ्लेक्स राष्ट्रवादीने जु्न्नरमध्ये लावले. गेल्यावर्षी २५ ऑक्टोबरला याबाबत पहिले पत्र दिले. त्यानंतर प्रक्रिया होऊन ही बससेवा सुरु झाली, असे बेनके यांनी यासंदर्भात 'सरकारनामा'ला सांगितले. त्यानंतर ही बससेवा सुरु होत असल्याचे कळताच भाजपने पत्र देऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. त्यातून त्यांचा शहरातील उतावळेपणा आता ग्रामीण भागातही दिसायला लागल्याचा टोमणा त्यांनी मारला.जुन्नरमध्ये भाजपचे नवे नेतृत्व उदयाला आलंय, असा टोलाही त्यांनी बुचके यांचे नाव न घेता लगावला. ही बससेवा चालू होणे महत्वाचे होते, असे मात्र त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.

तर, भोसरी ते जुन्नर पीएमपीची बससेवा सुरु करण्यांची सर्वस्वी संकल्पना ही आमदार लांडगे यांची असल्याचे अॅड. नितीन लांडगे म्हणाले. त्यासाठी लांडगे व बुचके यांनीच पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. मंचरपर्यंत पीएमपी बस सुरु झाली तेव्हा ती जुन्नरपर्यंत नेण्यासाठी लांडगेंनी पत्र दिले होते, अशी माहिती त्यांनी दिली. तर, आम्ही करून दाखवले या राष्ट्रवादीच्या श्रेयाच्या बॅनरबाजीवर ``आम्ही करतोय, हे महत्वाचे``असे उत्तर अॅड. लांडगे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT