Corporation Election Sarkarnama
पुणे

Local Body Election : भावी नगरसेवकांनी गणेशोत्सवात अर्धं मैदान मारलं; 50 हजारांपासून लाखाच्या वर्गणीतून केली मतपेरणी!

Corporation Election News : दीर्घ प्रशासकीय कालावधीनंतर महापालिका निवडणुका जाहीर होताच इच्छुकांनी गणेशोत्सव, दहीहंडीला उदंड देणग्या देत मतदारांशी संपर्क साधला असून नवरात्रातही नव्या आकर्षक मोहिमा आखल्या जात आहेत.

पीतांबर लोहार

1 महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता : सन २०१७ पासून तब्बल साडेतीन वर्षे प्रशासकीय कारभार झाल्यानंतर दिवाळीनंतर निवडणुकीची शक्यता असून मतदार याद्या, प्रभाग रचना यावर काम सुरू आहे.

2 इच्छुकांची सक्रिय मोहीम : माजी नगरसेवक आणि नवीन इच्छुक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसारख्या सणांत मोठ्या देणग्या देऊन, आरती-कार्यक्रमात सहभागी होऊन आपले ‘ब्रॅंडिंग’ करत आहेत.

3 आर्थिक जुळवाजुळव : जाहिरातबाजी, सणासुदीतील देणग्या, प्रभाग पॅनेलचे खर्च यासाठी लाखोंचे बजेट काढले जात असल्याची माहिती आहे.

Pune, 16 September : तब्बल साडेतीन वर्षांहून अधिकच्या प्रशासकीय कालावधीनंतर महापालिका निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह नव्या इच्छुकांची संख्याही वाढली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबिले जात आहेत. गणेशोत्सवात याची झलक बघायला मिळाली.

काही सार्वजनिक गणेश मंडळे व काही सोसायट्यांतील गणेशोत्सवातील (Ganeshotsav) आरत्या, कार्यक्रमांना उपस्थित राहून इच्छुकांनी सढळ हाताने वर्गणी दिली. हा आकडा तब्बल पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत होता. यापूर्वी दहीहंडी उत्सवातही लाखोंचे ‘लोणी’ चाखविण्यात व दाखविण्यात आले. आता नवरात्रोत्सवात मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल? त्यांना अधिकाधिक आकर्षित कसे करता येईल? याचे नियोजन इच्छुकांकडून सुरू आहे.

महापालिकेत २०१७ मध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची मुदत १३ मार्च २०२२ मध्ये संपली आहे. कोरोना प्रतिबंधक नियम, इतर मागासवर्गीयांना आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा आणि राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी आदी कारणांमुळे महापालिका निवडणूक (Corporation Election) वेळेत होऊ शकली नाही. त्यामुळे १४ मार्च २०२२ पासून महापालिका आयुक्त हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रशासनाने त्यावरील हरकती व सूचनांवर सुनावणी पूर्ण केली आहे. अंतिम प्रभाग रचना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल. मतदार याद्या अद्ययावत करण्याचे कामही सुरू आहे.

ही सर्व पार्श्वभूमी आणि दिवाळीनंतर निवडणूक होईल, अशा विश्वासाने इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या फुटीमुळे राजकीय पक्षांची संख्या वाढली आहे. प्रत्येक पक्षाचे नेते महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे ‘आपल्याला तिकिट मिळणारच’ या विचाराने प्रत्येक इच्छूक आपापल्या प्रभागात सक्रीय झाला आहे.

फलकबाजी सुरू आहे. सण, उत्सव, समारंभात हजेरी लावत आहेत. त्याची झलक गणेशोत्सवात बघायला मिळाली. अनेकांनी सार्वजनिक गणेश मंडळे व काही गृहनिर्माण सोसायट्यांच्या कार्यक्रमांना, आरतींना हजेरी लावून ‘महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक म्हणून आपले ब्रॅंडिंग’ सुरू केले आहे. मोठ्या रकमेच्या देणग्या आणि ‘आपली कामे’ करण्याची आश्वासने दिली आहेत.

आता नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांच्या कालावधीत होणाऱ्या ‘संभाव्य खर्चाचे, देणग्यांचे, विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचे बजेट’ काढले जात आहे. त्यासह निवडणूक लढणे व कार्यअहवाल तयार करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू आहे. काहीही झाले तरी, महापालिका निवडणूक लढवायचीच, असा ठाम निश्चय इच्छुकांनी केल्याचे वातावरण शहरात आहे.

अनुभवाचे बोल अन् जिंकण्याचा निर्धार...

चार सदस्यांचा प्रभाग असल्याने परिसर खूप मोठा होता. तरीही मागच्या वेळेस आमचे पॅनेल थोडक्यात पडले. आता परिस्थिती बदलली आहे. प्रभाग तेवढाच आहे. पण, आमच्या भागात लोकसंख्या पर्यायाने मतदार वाढले आहेत. त्यामुळे आमचा विजय नक्की आहे. काहीही झाले तरी कोणत्याही परिस्थितीत आम्हाला पॅनेल काढायचे आहे.

काहीजण आम्हाला सोडून गेले, काही नवीन मिळाले आहेत. प्रभाग मोठा असला तरी नगरसेवक असताना पाच वर्षे केलेली कामे आणि गेल्या साडेतीन वर्षात मतदारांशी सातत्याने ठेवलेला संपर्क, यामुळे आपले काम लोकांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे समोर कोणीही उभा असला तरी विजय आपलाच होणार आहे. लोकांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मच्या भागात यावर्षी गणेश मंडळे खूप होती. शिवाय, सोसायट्यांची संख्याही खूप वाढली आहे. प्रत्येक सोसायटीत कार्यक्रम होते. अनेक जण आरतीला बोलावत होते. इच्छूक म्हणून जावेच लागले. आरतीला गेलो; म्हणजे वर्गणी द्यावीच लागली. मंडळांना पन्नास हजार आणि सोसायट्यांना एक लाख रुपये असे देणग्याचे स्वरूप होते. काय करणार? द्यावेच लागले.

प्र.1: महापालिकेची निवडणूक उशिरा का झाली?
उ. – कोरोना नियम, ओबीसी आरक्षणाचा कायदेशीर मुद्दा आणि राजकीय बदल यामुळे निवडणूक पुढे ढकलली गेली.

प्र.2: सध्या शहराचा कारभार कोण पाहत आहे?
उ. – १४ मार्च २०२२ पासून महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.

प्र.3: इच्छुक उमेदवार मतदारांपर्यंत कसे पोहोचत आहेत?
उ. – गणेशोत्सव, सोसायटी कार्यक्रम, नवरात्रोत्सवात मोठ्या देणग्या देऊन आणि उपस्थित राहून संपर्क वाढवत आहेत.

प्र.4: या निवडणुकीत प्रभाग रचना कशी असेल?
उ. – २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT