Nagpur Winter Session Sarkarnama
पुणे

Nagpur winter session : विधानसभेत पुण्याच्या आमदारांची 'अळीमिळी गुपचिळी

Chaitanya Machale

Nagpur  News : नागरपूर अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये भाजप वगळता अन्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या आमदाराला प्रश्न तसेच लक्षवेधीसाठी संधी दिली जात नसल्याची तक्रार सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटातील आमदारांनी केली आहे. तर दुसरीकडे पुणे शहरातील प्रश्नाकडे भाजप आमदार देखील फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र या अधिवेशनामध्ये दिसत आहे. त्यामुळे या अधिवेशनातून अद्याप तरी पुणेकरांच्या पदरात फक्त निराशाच पडली आहे.   

पुणे शहरात आठ आमदार आहेत. त्यापैकी कोथरूड, खडकवासला, पर्वती, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट या पाच मतदार संघात भाजपचे तर हडपसर, वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँगेस, आणि कसबा मध्ये काँग्रेसचा एक असे आमदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही आमदार राष्ट्रवादी काँगेस मधील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 त्यामुळे या अधिवेशन काळात सत्ताधारी पक्षांचे आमदार म्हणून  विधानसभेत काम करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा पुण्यातील अजित पवार गटांतील आमदारांना होती. त्यासाठी या आमदारांनी अनेक प्रश्न तयार करून त्यावर विधिमंडळाच्या सभागृहात चर्चा करण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवशी त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दोन्ही दिवसात एकही प्रश्न आणि चर्चा करण्याची संधी पुण्यातील एकाही आमदारांना मिळाली नाही. यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून विधानसभेत हजर असलेल्या शहरातील आमदारांचा हिरमोड झाला आहे. सत्तेत असून देखील एका ही विषयावर बोलण्याची संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

अजित पवार गटाच्या आमदारांच्या पदरी उपेक्षाच 

दीड ते पावणेदोन वर्षापूर्वी राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मध्ये नागरिकांच्या विकासासाठी सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँगेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँगेस मध्ये बंड करण्यात आले. राज्यातील विविध विकासाचे प्रश्न मार्गी लागावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीमधून बंड करून बाहेर पडलेल्या नेत्यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे. विकासाच्या मुद्यावर शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटाच्या आमदारांच्या पदरी सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपेक्षाच असल्याचे समोर आले आहे.  

(Edited by Sudesh Mitkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT