Nagpur News : हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु कितीही राजकीय वैर असले तरी एखाद्या चांगल्या कामाबद्दल मनमोकळेपणाने प्रशंसा करण्याचा दिलदारपणा आजही कायम आहे. याची प्रचिती नुकतीच आली.
विधानसभेच्या सभागृहात गृहनिर्माण मंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या सविस्तर माहितीमुळे काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात चांगलेच प्रभावित झाले. राज्यातील शिंदे- फडणवीस आणि आता अजित पवारांमुळे ट्रिपल इंजिनच्या सरकारचे हे दुसरे हिवाळी अधिवेशन आहे. त्यामुळे पहिल्या अधिवेशनात मंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे, केलेली मांडणी याची तुलना या वेळी राजकारणातील दिग्गज आणि अनुभवी मंत्र्यांकडून होताना दिसली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आदिवासी विभागाच्या विविध प्रश्नांवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जेव्हा सत्ताधारी मंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती फोडण्यात अतुल सावे यशस्वी ठरले. इतर मागास बहुजन विभागाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, संस्थांचे थकलेले अनुदान यासह रिक्त पदांसाठी गेल्या अधिवेशनात केलेल्या पाठपुराव्याचे काय झाले? त्याचे निर्णय कधी घेणार? असा प्रश्नांचा भडीमार वडेट्टीवार यांनी केला. यावर अतुल सावे यांनी अतिशय आत्मविश्वासाने उत्तरे देत विरोधी पक्षाला गप्प केले. याच विभागाशी संबंधित एका प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सावेंचे तोंड भरून कौतुकही केले.
गेल्या वेळच्या अधिवेशनात अतुल सावेंचा एवढा अभ्यास नव्हता, या वेळी मात्र ते चांगला अभ्यास करून आले आहेत. विरोधकांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देत आहेत ही चांगली गोष्ट आहे, अशा शब्दांत थोरात यांनी सावेंचे कौतुक केले. मग काय पुढच्या बाकावर बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही खूश झाले. आणि सावेंच्या सविस्तर उत्तरावर बाक वाजवत त्यांना प्रतिसाद देताना दिसले.
छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघातील अतुल सावे हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. सरकारचा कालावधी संपता संपता शेवटच्या चार महिन्यांत झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सावे यांना संधी मिळाली होती.
पुढच्या मंत्रिमंडळात तुम्हाला कॅबिनेट मंत्री करतो, असे आश्वासन फडणवीस यांनी त्यांना दिले होते. परंतु 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि सावे यांना कॅबिनेटच्या भरतीसाठी चार वर्षे वाट पाहावी लागली. शिंदे फडणवीस- सरकारमध्ये त्यांना आधी सहकार खात्याचा कारभार सोपवण्यात आला होता. परंतु सरकारमध्ये अचानक अजित पवार गटाची एन्ट्री झाली आणि यामध्ये काही महत्त्वाची खाती त्यांच्या वाट्याला गेली. या अदलाबदलीमध्ये सावेंचे सहकार खाते गेले आणि त्यांना गृहनिर्माण आणि आदिवासी विभागाचा पदभार सोपवण्यात आला. फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतुल सावे यांचे सभागृहात झालेलं कौतुक पाहून त्यांचीही छाती अभिमानाने फुगली नसेल तर नवलच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.