Dilip Mohite Patil  Sarkarnama
पुणे

NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह अजित पवारांकडे; आता आमदार दिलीप मोहितेंनी केला मोठा दावा

उत्तम कुटे

Pimpri News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिला. या निर्णयावर बोलताना आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी मोठा दावा केला आहे. 'पक्षाचं चिन्ह अजितदादांनाच मिळणार होतं, असं भाकीत मी पक्ष फुटल्यानंतर गेल्यावर्षीच केलं होतं, तेच खरं ठरलं', असा दावा खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला. (Dilip Mohite Patil On NCP Crisis)

दरम्यान, अण्णा म्हणून आमदार मोहिते हे कार्यकर्त्यांमध्ये परिचित आहेत. तसेच त्यांच्य़ाच पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हेही अण्णा म्हणूनच ओळखले जातात. हे तिघेही अण्णा आमदार अजितदादांच्या दोन्ही बंडात त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहिलेले आहेत. ते तिघे काल मुंबईत होते. आयोगाच्या निकालानंतर अजितदादांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला बनसोडे हे अजित पवारांच्या मागेच होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तिघेही अण्णा आमदार आक्रमक आहेत. 2 जुलै 2023 ला पक्ष दुभंगल्यानंतर अजित पवारांना प्रमुख करा, असे मी शरद पवारांना त्यावेळीच म्हटले होतं. तसं बोलणारा मी पहिला आमदार होतो. पण, तेव्हा तसं केलं गेलं नाही. पण, आता ते घडलं, झालं, असा दावा मोहितेंनी आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना केला.

बिनधास्त स्वभावाच्या आक्रमक आमदार मोहितेंनी आपला पक्ष सत्तेत असलेल्या राज्य सरकारलाच नुकताच घरचा आहेर दिला होता. भाजप, शिंदे शिवसेना आणि आम्ही (अजित पवार राष्ट्रवादी) एकत्र काम करीत असल्याबद्दल खेद वाटत असल्याचे ते म्हणाले होते. तसेच तिन्ही पक्षांची अवस्था ही मुंबईत एका छोट्या खोलीत गैरसोय होत असूनही नाईलाजाने दाटीवाटीने राहणाऱ्या तीन बिऱ्हाडासारखी असल्याचा टोला त्यांनी लगावला होता.

दरम्यान, आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करताना तो अपेक्षितच होता. पण, त्यामुळे शरद पवारांचा पराभव झाला, असं म्हणता येणार नाही, असे आमदार बनसोडे म्हणाले. पण, पवारसाहेबांनी आता वयोमानाप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते आमचे आदर्श नेते असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत, असे बनसोडे यांनी स्पष्ट केले.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT