Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Pune Bazar Samiti : पुणे बाजार समितीत नवा ट्विस्ट; अजितदादांच्या शिलेदाराला सभापती करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्याची फिल्डिंग

Ajit Pawar Group Vs BJP News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एप्रिल 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत अतिआत्मविश्वासात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या बंडखोरांनी दणका दिला होता. भाजपच्या पाठबळावर राष्ट्रवादीतील बंडखोरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दणका देत बाजार समितीची सत्ता हस्तगत केली हेाती

Sudesh Mitkar

Pune, 08 July : पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी मोठी घडामोड घडली आहे. बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजप नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. हा राजीनामा नेमका का घेण्यात आला आणि त्यानंतर सभापतिपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pune Bazar Samiti) एप्रिल 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत अतिआत्मविश्वासात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या बंडखोरांनी दणका दिला होता. भाजपच्या पाठबळावर राष्ट्रवादीतील बंडखोरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दणका देत बाजार समितीची सत्ता हस्तगत केली हेाती. मात्र, अडीच वर्षांनंतर काळभोर यांनी राजीनामा दिल्याने आणि राष्ट्रवादीही महायुतीत भाजपसोबत असल्याने अजितदादा समर्थकांच्या इच्छा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर (Dilip Kalbhor) यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (ग्रामीण) यांच्याकडे आपल्या सभापतिपदाचा राजीनामा सोमवारी (ता. 07 जुलै) दिला आहे. काळभोर यांनी अडीच वर्षांचा ठरलेला कालावधी संपताच सोमवारी सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. आता काळभोर यांच्या जागी कोणाला संधी मिळते, याकडे पुण्याचे लक्ष लागले आहे.

काळभोर यांनी राजीनामा देण्याअगोदर झालेल्या बैठकीला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक व माजी सभापती प्रकाश जगताप, संचालक रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, रामकृष्ण सातव सुदर्शन चौधरी यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. उपस्थित सर्वांशी झालेल्या चर्चेनंतर काळभोर यांनी राजीनामा दिला आहे.

बाजार समितीची वार्षिक उलाढाल तब्बल पाच ते सात हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे आता सभापती कोण होणार, आणि कोणत्या पक्षाच वर्चस्व बाजार समितीवर राहणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सध्या प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे आणि राजाराम कांचन अशी तीन नावे सभापतिपदासाठी चर्चेत आहेत. इच्छुकांपैकी एकाचे नाव भाजपचे वरिष्ठ नेते आणि तालुक्यातील नेते निश्चित करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

प्रमुख तीन इच्छुकांमधील प्रकाश जगताप आणि राजाराम कांचन हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे शिलदार आहे, तर रोहिदास उंद्रे हे भाजपकडून सभापतिपदासाठी इच्छुक आहेत. मात्र, सध्या प्रकाश जगताप यांचे नाव आघाडी वर असून भाजपचेच काही वरिष्ठ मंडळी त्यांच्यासाठी फिल्डिंग लावत असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपच्या मदतीने पुणे बाजार समितीमध्ये दादांचा शिलेदार सभापती होणार की भाजप आपल्या कार्यकर्त्याची वर्णी सभापतिपदी लावणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT