Solapur NCP SP : शरद पवारांच्या निरोपाची बळीराम साठेंना प्रतीक्षा; निर्णय होत नसल्याने पुन्हा निर्वाणीचा इशारा
Solapur, 08 July : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर खुद्द शरद पवारांनी सांगितले तरी आपण आता पक्षात थांबणार नाही, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांनी दिला होता. मात्र, पवारांच्या भेटीनंतर साठे यांनी बंडाची तलवार म्यान करत पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी त्यांना जिल्हाध्यक्षपदाचा शब्द पवारांनी दिला होता. मात्र, त्याला 14 दिवसांचा कालावधी उलटूनही कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत, त्यामुळे साठे समर्थक अस्वस्थ आहेत. साठे यांना पवारांच्या निरोपाची प्रतीक्षा असून येत्या सात दिवसांत निर्णय न झाल्यास पक्ष सोडण्याचा इशारा त्यांनी पुन्हा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदावरून बळीराम साठे (Baliram Sathe) यांची उचलबांगडी करून त्या ठिकाणी मोहिते पाटील समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर बळीराम साठे यांनी समर्थकांच्या मेळाव्यात पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता.
पक्षनेतृत्वाने विश्वासात घेऊन राजीनामा देण्यास सांगितले असते तर आपण स्वतःहून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असता. मात्र, आपल्याला अवमानकारक पद्धतीने पदावरून हटविण्यात आले आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहायचे नाही. खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले तरी यापुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थांबायचे नाही, असे जाहीर केले होते.
साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांना इतर पक्षांकडून प्रवेशाची ऑफर आल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यांनी साठे यांची वडाळ्यात जाऊन भेट घेतली होती. त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी विचारणा होत होती. तसेच प्रयत्न शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली होती.
दरम्यानच्या काळात शरद पवार यांनी साठे यांना भेटीचा निरोप धाडला हेाता. त्यानंतर पवारांना भेटणार नाही, म्हणणारे साठे यांनी बारामतीत गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली हेाती. त्या भेटीत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत साठे यांचा सहभाग असेल. ते जिल्हाध्यक्षपदी कायम राहतील, म्हणजे पूर्व सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी साठे यांच्याकडे असेल असे संकेत पवारांनी दिले होते.
भाजपच्या निर्णयाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात दोन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नेमण्याचे संकेत त्या भेटीनंतर मिळाले होते. खुद्द शरद पवार यांनी शब्द देऊन आता चोवीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्याप साठे यांना वरिष्ठांकडून कोणत्याही पदाबाबत सांगण्यात आले नाही, त्यामुळे साठे समर्थकांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे.
आगामी सात दिवस आपण वाट पाहणार आहोत, त्यानंतर तालुक्यात बैठक घेऊन दुसऱ्या पक्षात जाण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे बळीराम साठे यांनी म्हटले आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रदेश स्तरावर हा निर्णय कधी होणार, याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.