Sharad Pawar-Omraje Nimbalkar
Sharad Pawar-Omraje Nimbalkar  Sarkarnama
पुणे

Omraje Nimbalkar On Reservation : ओमराजे निंबाळकरांनी सुचवला आरक्षणाचा तिढा सोडवण्याचा मार्ग

Sudesh Mitkar

Pune, 23 June : सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात रान पेटले आहे. आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने सरकारवर करण्यात येत आहे. तसेच, आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारने आरक्षणाचा तिढा सोडवावा, अशी मागणी करताना त्यासाठीचा तोडगाही सुचविला आहे.

ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar ) यांनी आज (ता. 23 जून) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ओमराजे निंबाळकर म्हणाले, गेल्या अडीच वर्षामध्ये जे पक्षफुटीच राजकारण झालं. लोकशाही मार्गाने ज्यांनी पक्ष स्थापन केले होते, त्यांनाच ते नाही म्हटलं गेलं. पक्षातून बेदखल करण्यात आलं. चिन्ह काढून घेण्यात आली. निवडणूक आयोगाला हाताशी धरून आणि जनतेला गृहीत धरून जो काही हा प्रकार करण्यात आला होता, त्याला लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे आणि 85 वर्षे वय असलेले शरद पवार यांच्या संघर्षामुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एवढं मोठं यश मिळालं आहे. या वयातही शरद पवार यांनी संबंध महाराष्ट्र पिंजून काढला त्यांनी माझ्या मतदारसंघातही सभा घेतली होती. त्यामुळेच त्यांचे आभार मानण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आज मी त्यांची भेट घेतली.

येत्या संसदेच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात आपण संसदेत आवाज उठवणार का? असा विचारला असता ओमराजे निंबाळकर म्हणाले, जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. तेव्हा लोकसभेमध्ये मी पहिला खासदार होतो, ज्याने याबाबत आपलं मत ठामपणे मांडलं होतं.

तमिळनाडूमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तत्कालीन केंद्र सरकारने जी पावलं उचलली होती. तीच पावलं आत्ताच्या केंद्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात उचलावी आणि मराठा आरक्षण रद्द होऊ देऊ नये, या संदर्भात पूर्वीपासून संसदेत मी भांडत आलो आहे. मात्र, दुर्दैवाने केंद्र सरकारने त्यात लक्ष घातलं नाही. मात्र, माझी सरकारला विनंती आहे की. मराठा आरक्षणासंदर्भात कायदा करावा आणि समाजातला कोणताही व्यक्ती या आरक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सूचविले.

आरक्षणाच्या आंदोलनाबाबत ओमराजे निंबाळकर म्हणाले, सर्व जाती धर्मांमध्ये सलोखा असणं, ही पुरोगामी महाराष्ट्राची गरज आहे आणि जर दोन जातींमध्ये तेढ निर्माण होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी असून ते रोखणं सरकारची जबाबदारी आहे. जी आश्वासनं सरकारने आंदोलकांना दिली आहे, ती पूर्ण करण्याची देखील जबाबदारी सरकारची आहे.

मनोज जरांगे पाटील हे सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत, जे मराठा समाजासाठी आरक्षणाची लढाई लढत आहेत. मात्र, कुठेतरी जातीय सलोखा जपणेही गरजेचे असल्याचं ओमराजे निंबाळकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT