Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Baramati Politic's : अजितदादांनी ‘माळेगाव’ची निवडणूक लढविण्याचे गुपित फोडले; ‘आमचेच पुढारी गद्दारी करून आमचा पराभव करतात; म्हणून..’

Malegaon Sugar Factory Election 2025 : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी खासगीकरण, कर्जबाजारीपणा असे विविध मुद्दे पुढे करून माझी आणि संचालक मंडळाची बदनामी केली आहे. पण, सभासदांनी विरोधकांचा धुव्वा उडवून त्यांना चोख उत्तर दिले आहे.

कल्याण पाचांगणे

Baramati, 29 June : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमचा पराभव आमचेच पुढारी गद्दारी करून करतात. विरोधकांमध्ये आम्हाला पाडण्याची धमक नाही, त्यामुळेच यंदा ‘माळेगाव’च्या निवडणुकीत माझी उमेदवारी जाहीर केली. परंतु पुन्हा आमच्यामध्येच चेअरमनपदाची रस्सीखेच सुरू झाली. त्याचा फटका पॅनेलला बसू शकतो, हे मी ओळखून मीच ‘माळेगाव’चा चेअरमन होणार असे जाहीर केले, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘माळेगाव’ची निवडणूक लढविण्याचे गुपित फोडले.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधकांच्य डोक्यात वेगळीच हवा होती, त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही प्रस्ताव नाकारला होता. पण, माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांनी एका दणक्यात विरोधकांच्या डोक्यातील हवा उतरवली. माझ्या चेअरमनपदाच्या काळात माळेगाव राज्यातच नव्हे तर देशात प्रथम क्रमांकावर येईल.

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Malegaon Sugar Factory Election) विरोधकांनी खासगीकरण, कर्जबाजारीपणा असे विविध मुद्दे पुढे करून माझी आणि संचालक मंडळाची बदनामी केली आहे. पण माळेगावच्या सभासदांनी विरोधकांचा धुव्वा उडवून त्यांना चोख उत्तर दिले आहे, असा दावाही अजितदादांनी केला.

अजित पवार म्हणाले, माळेगाव सहकारी साखर कारखाना राज्यात उच्चांकी ऊसदर देईल, कारखाना कार्यस्थळ आणि परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. शिवनगर शिक्षण संस्थेला २५ कोटींपेक्षा जास्त सीएसआर फंड देण्यात येईल.

एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी एआय तंत्रज्ञान सवलतीमध्ये उपलब्ध करून देणार, अशा मुद्यांवर आम्ही निवडणूक जिंकली आहे. पण आमची जबाबदारी वाढली असून शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात येतील. तसेच, माळेगाव कारखाना देशात सहकारात प्रथम क्रमांकावर नेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित संचालक मंडळ गाडी अथवा कोणत्याच सेवा सुविधांचा लाभ घेणार नाही. चेअरमनपदाची निवडणूक येत्या पाच जुलै रोजी होणार आहे. पाच वर्षांत पाच उपाध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. कारखान्याच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणावी लागणार आहे. तसेच, छत्रपती साखर कारखान्याला सरकारी पातळीवरून आर्थिक मदत करण्यात येणार आहे, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT