Pune Political News : शहरातील विविध भागातील विकासकामांसाठी बजेटमध्ये पालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांची कामे प्रस्तावित केली जातात. ही कामे करण्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद केली जाते. या बजेटची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू होते. सध्या पालिकेत प्रशासकीय कारभार असल्याने लोकप्रतिनिधींचा कोणताही हस्तक्षेप होत नाही. असे असतानाही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यंदा शेवटच्या टप्प्यात टेंडर काढण्याचा 'विक्रम'च केला आहे. आयुक्तांच्या या कृतीवर शहरातून शंका उपस्थित केली जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक वर्षे संपण्यास दोन महिने शिल्लक असताना गेल्या दहा दिवसांत 300 ते 350 कोटींच्या तब्बल 291 टेंडर महापालिकेने काढली आहेत. 25 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या काळात महापालिकेच्या विविध विभागांच्या टेंडरचा समावेश आहे.
दरवर्षी आर्थिक वर्षे संपत असताना जानेवारी तसेच फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात कामांची टेंडर काढली जातात. नगरसेवकांच्या दबावामुळेच ही टेंडर काढावी लागत असल्याचा दावा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून नेहमी केला जातो. याचे संपूर्ण खापर लोकप्रतिनिधींवर सर्रासपणे फोडण्यात येते. आता मात्र महापालिकेत प्रशासनाचा कारभार असतानाही एवढ्या मोठ्या संख्येने टेंडर काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेच्या विविध विभागांनी या निविदा काढल्या असून, १० लाखांपासून कोट्यवधी रुपयांपर्यंतची कामे यामध्ये प्रस्तावित करण्यात आली आहेत. बजेटमधील कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या हातात वर्षेभराचा वेळ असतानाही अखेरच्या दोन महिन्यांत इतक्या मोठ्या संख्येने टेंडर काढल्याने माजी पदाधिकारी शंका व्यक्त करत आहेत.
लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) पुढील दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याची आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता असल्याने त्याची कोणतेही अडचण ठरू नये, यासाठी महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी 25 फेब्रुवारीपर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश सर्व खातेप्रमुखांना दिला. त्यामुळे आपली कार्यक्षमता दाखवित पालिकेच्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, गार्डन, पथ या विभागांसह सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून लहान-मोठ्या कामांची टेंडर काढण्यास सुरुवात केली.
गेल्या दहा दिवसांमध्ये 291 टेंडर पालिकेने (Pune Corporation) काढली असून याची किंमत तीनशे ते साडेतीनशे कोटींच्या आसपास आहे. बजेटमधील निधी वाया जाऊ नये, यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे. प्रशासनाच्या वतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात काढण्यात येत असलेल्या टेंडरबाबत आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यापूर्वी पालिकेत लोकप्रतिनिधी असताना अखेरच्या महिन्यात टेंडर काढल्यास त्याचे संपूर्ण खापर लोकप्रतिनिधींच्या नावाने फोडले जात होते. लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली प्रशासनाला काम करावे लागते असे सांगितले जात होते. आता पालिकेत प्रशासक असतानाही ही वेळ का आली? असा प्रश्न कुंभारांनी उपस्थित केला. हा प्रकार म्हणजे प्रशासनाचे आणि पालिका आयुक्तांचे अपयश असल्याची टीकाही त्यांनी केली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.