Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News: महाराष्ट्राच्या विकासातील पवारांचे योगदान उलगडणार पाच खंड : पहिल्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

Sharad Pawar and Maharashtra: पवार हे केवळ एक व्यक्ती नाहीत, तर संस्था आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजकीय कारकिर्दीस पुढील महिन्यात ५६ वर्षे पूर्ण होत आहेत. या ५६ वर्षांत पवार यांनी महाराष्ट्राच्या (Maharashtra) विकासात भरीव योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान, दूरदृष्टी ‘शरद पवार आणि महाराष्ट्र’ या ग्रंथमालिकेतून उलगडण्यात येणार आहे. पाच खंडांची ही ग्रंथमालिका असून त्यातील ‘शरद पवार आणि महाराष्ट्र-भाग १’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (ता. २६ फेब्रुवारी) पुण्यात (Pune) पवारांच्या उपस्थितीत होणार आहे. (Publication of the book 'Sharad Pawar and Maharashtra' on Sunday)

राज्याच्या व देशाच्या राजकारणात दीर्घ काळापासून अवीट ठसा उमटविणारे नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. शरद पवार यांची सार्वत्रिक ओळख ही राजकारणी असली, तरी त्यांनी केवळ राजकारणापुरते स्वत:ला कधीच बंदिस्त ठेवलेले नाही. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा, आरोग्य, कृषी, ग्रामीण आणि शहरी विकास अशा विविध क्षेत्रांत ते विकासात्मक दूरदृष्टी आणि सकारात्मक हस्तक्षेप या भूमिकेतून लीलया वावरत राहिले आहेत.

पवार हे केवळ एक व्यक्ती नाहीत, तर संस्था आहेत. आजवर त्यांनी अनेक व्यक्ती, संस्था उभारल्या, उभारण्यासाठी मदत केली, मदत मिळवून दिली आहे. अशा अगणित संस्थांत्मक कामांतून त्यांनी कितीतरी माणसे उभी केली आहेत. संस्थात्मक उभारणींवर त्यांचा आधीपासूनच भर राहिला आहे. मग तो साखर कारखाना असो, ‘एमआयडीसी’ असो, शिक्षणसंस्था असो, सूत गिरणी असो, वा संशोधन संस्था असोत. अशा अनेक संस्थांच्या यशाची, पायाभूत सुविधांची फळे आजची पिढी चाखत आहे. त्यामुळे, पवारांची खरी राजकीय कारकीर्द ही व्यक्ती आणि संस्थांच्या आधारे पाहावी लागेल.

पवार यांनी राज्याच्या विकासात दिलेले योगदान हे राज्यपातळीपेक्षा गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर उलगडल्यास या योगदानाची व्याप्ती लक्षात येईल. या उद्देशाने पुण्यातील स्ट्रॅटेजी कॉर्पोरेशन या संस्थेच्या वतीने ‘शरद पवार आणि महाराष्ट्र’ या ग्रंथमालिकेचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत पवार यांचे महाराष्ट्रातील योगदान जिल्हानिहाय उलगडण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई-ठाणे-कोकण आणि उत्तर महाराष्ट्र अशा पाच विभागांवरील पाच खंडांचा हा प्रकल्प आहे.

राज्यातील प्रत्येक विभागांतील जिल्ह्यांमध्ये पवार यांनी दिलेल्या योगदानाचा व त्या जिल्ह्यांशी असलेल्या त्यांच्या नात्याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यातील पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर आधारलेल्या ‘शरद पवार आणि महाराष्ट्र-भाग १’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी होत आहे, असे स्ट्रॅटेजी कॉर्पोरेशनचे संचालक व प्रकाशक सुरेश इंगळे यांनी सांगितले.

पुस्तक प्रकाशन सोहळा हा रविवारी सायंकाळी ५.३० वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे हे पुस्तकाचे संपादक, तर सुरेश इंगळे हे प्रकल्प संपादक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT