Muralidhar Mohol Jagadish Mulik News : Pune BJP News
पुणे

Pune BJP News : मोहोळ-मुळीकांमध्ये 'इव्हेंट वॉर' ; भाजपच्या प्रचाराला सुरवात ?

Muralidhar Mohol Jagadish Mulik News : पुण्यातून इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांमध्ये सध्या इव्हेंट वॉर सुरू..

Sudesh Mitkar

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी ज्याप्रमाणे पक्ष पातळीवरची सुरू आहे, तशीच तयारी इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने करताना दिसत आहेत. आपल्या उमेदवारीचा खुंटा बळकट करण्यासाठी विविध माध्यमातून कसं प्रसिद्धी झोतात राहता येईल याचा प्रयत्न सध्या इच्छुक करत आहेत. यातूनच पुण्यातून इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांमध्ये सध्या 'इव्हेंट वॉर' सुरू झालं असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या सर्व इव्हेंटला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे उपस्थित राहत आहेत. (Latest Marathi News)

सध्या पुणे लोकसभेसाठी भाजपमधून प्रामुख्याने तीन नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. यामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक तर तिसरं नाव हे ईशान्य भारतात भाजपाला उभारी देणारे माजी संघ प्रचारक सुनील देवधर यांचं आहे. यामध्ये आता पुस्तक महोत्सव कार्यक्रम घेऊन राजेश पांडे यांनीही उडी घेतल्याचं बोललं जात आहे.

मागील महिन्यात मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठे रक्तदान शिबिर आयोजित करत या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना बोलवलं होतं. यानंतर थोड्याच दिवसांत जगदीश मुळीक यांनी बागेश्वर बाबा यांना बोलवून मोठा दरबार भरवला. या दरबाराला फडणवीसांनीही उपस्थिती लावली होती. अनेक कारणांनी हा इव्हेंट शहरात चर्चेचा विषय ठरला होता.

हा पहिला राऊंड झाल्यानंतर आता जगदीश मुळीक यांनी आघाडी घेऊन पुणे थॉन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानंतर आता मोहळ यांनी देखील 'अटल संस्कृती गौरव पुरस्कार' कार्यक्रम आयोजित केला आहे. यात डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या 'इव्हेंट वॉर'मध्ये आता सुनील देवधर देखील उडी घेणार असल्याचे बोललं जात आहे. सुनील देवधर लवकरच लता मंगेशकर यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन या महिना अखेरपर्यंत करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत चर्चेत राहून आपली उमेदवारी बळकट करण्याचे काम हे भाजपचे इच्छुक करत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे भविष्यात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. तसेच त्यांच्या 'अटल संस्कृती पुरस्कार' कार्यक्रमाचं यंदा पाचवे वर्ष आहे. मोहोळ यांचे कार्यक्रम दरवर्षी साजरे होत असले तरी तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणूक धामधूमीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचा आवाका मोठा असणार आहे. साहजिकच याचा संबंध आगामी लोकसभेच्या उमेदवारीशी जोडला जात आहे. आपली दावेदारी पक्की करण्यासाठी मोहोळे-मुळीक-देवधर यांच्याकडून इव्हेंटबाजीला सुरूवात झाल्याची पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT