Fraud News  Sarkarnama
पुणे

BJP Pune News: भाजपच्या माजी नगरसेवकाने पुणेकरांना घातला २५ कोटींचा गंडा? काय आहे प्रकार...

Pune Crime News : गॅस एजन्सीमध्ये रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा जास्त परतावा देतो...

Mangesh Mahale

Pune : पुण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असताना आता भाजपच्या माजी नगरसेवकाने अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

भाजपचे माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी (वय ६५) व त्यांचा मुलगा मयूरेश (वय ४६, दोघे रा. पानमळा) यांच्याविरोधात आत्तापर्यंत नऊ जणांनी तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे.

सुमारे शंभर जणांना फसवून त्यांना २५ कोटींचा गंडा घातल्याचा आरोप जोशी बाप-लेकावर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. गॅस एजन्सीमध्ये रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा जास्त परतावा देतो, असे आमिष दाखवून दोघांनी पुण्यातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

अशी केली फसवणूक...

सदाशिव पेठेतील मंगेश जगदीश खरे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात जोशी बाप-लेकाच्या विरोधात तक्रार केली आहे. मंगेश खरे यांनी त्यांचे व त्यांच्या आईचे असे एकूण १४ लाख १० हजार रुपये मयूरेश यांच्या श्रीराम गॅस एजन्सीत गुंतवले होते. त्यावर खरे यांना अद्यापपर्यंत कुठलाही परतावा मिळाला नाही. जुलै २०२१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनेकांना दाखवले जास्त परताव्याचे आमिष...

खरे यांनी आपल्या पैशाची मागणी केली असता, त्यांना "तुला जिवाची भीती वगैरे वाटत नाही का? अशी धमकी जोशी यांनी दिली. खरे यांच्याप्रमाणे आठ ते नऊ जणांनी अशीच फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. यातील आठ जणांनी तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणात अजून काही जणांची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोण आहेत उदय जोशी?

१९९७ ते २००२ दरम्यान जोशी हे सदाशिव पेठेतून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांच्या पत्नी शुभदा या नगरसेविका झाल्या. त्यानंतर मयूरेश यांना गॅस एजन्सीचा परवाना मिळाला.

काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा

जमिनीला टाकण्यात येत असलेले कुंपण आणि हद्दीच्या वादातून जमीन मालक महिलेला धमकावून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजित यांच्यासह १० जणांविरुद्ध वानवडी पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT